Netflix Women Centric Movies Webseries: एकेकाळी चित्रपटांमध्ये महिलांची भूमिका केवळ नायकाभोवती फिरणारी असायची. मात्र आता चित्र बदललं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे महिलांच्या आयुष्यावर, संघर्षावर, स्वप्नांवर आणि त्यांच्या ताकदीवर आधारित कथा मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्या आहेत. विशेषतः नेटफ्लिक्सवर (Netflix) गेल्या काही वर्षांत अशा अनेक महिला-केंद्रित चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या, ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जाणून घेऊया अशाच सात गाजलेल्या कलाकृतींबद्दल…(Women Centric Films)
‘माँ-बहन’
4 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘माँ-बहन’या चित्रपटाची कथा एका आई आणि तिच्या दोन मुली जया आणि सुष्मा यांच्याभोवती फिरते. तिघींची स्वप्नं, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि संघर्ष वेगवेगळे असले तरी त्या एकमेकींच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात. समाजाच्या दबावातही स्वतःचा मार्ग निवडणाऱ्या या तिन्ही महिलांची कथा प्रेक्षकांना भावली.

‘मेड इन कोरिया’
तामिळनाडूमधील छोट्या गावातून दक्षिण कोरियात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी निघालेल्या शेनबागमची ही प्रेरणादायी कहाणी आहे. प्रेमावर विश्वास ठेवून परदेशात गेलेली ही तरुणी अनेक संकटांचा सामना करत स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहते. परंपरांपेक्षा स्वतःची स्वप्नं महत्त्वाची मानणाऱ्या महिलांसाठी ही कथा प्रेरणादायी ठरते.

‘अक्यूज्ड’
यशस्वी आणि प्रतिष्ठित डॉक्टर गीतिका सेन यांचं आयुष्य एका आरोपानंतर पूर्णपणे बदलून जातं. लैंगिक शोषण आणि सहकाऱ्याचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर सुरू होणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या मालिकेने तब्बल 72 देशांमध्ये लोकप्रियतेचा विक्रम केला होता.
‘दिल्ली क्राईम’
नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक गाजलेल्या भारतीय मालिकांपैकी ‘दिल्ली क्राईम’ ही एक आहे. या मालिकेचे दोन सीझन प्रदर्शित झाले असून दोन्हीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पोलीस अधिकारी वर्तिका चतुर्वेदी यांच्या धैर्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुणांवर आधारित ही कथा एका महिला अधिकाऱ्याचा वेगळा पैलू उलगडते.
‘हीरामंडी: द डायमंड बाजार’
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या मालिकेतून ओटीटी विश्वात पदार्पण केले. मल्लिकाजान आणि फरीदन या दोन प्रभावी महिला पात्रांभोवती फिरणारी ही कथा ब्रिटिश राजवटीतील सत्तासंघर्ष नव्या दृष्टिकोनातून मांडते. या मालिकेत मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, ऋचा चड्ढा आणि शर्मिन सेगल यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

‘डार्लिंग्स’
आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक ठरला. कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जाणाऱ्या एका महिलेची ही कथा आहे. अन्याय सहन करण्यालाही मर्यादा असते आणि त्यानंतर स्त्री किती खंबीरपणे उभी राहू शकते, हे या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे.

‘दो पत्ती’
2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो पत्ती’ या चित्रपटातून कृती सेननने ओटीटीवर पदार्पण केलं. या सस्पेन्स-थ्रिलरमध्ये तिने दुहेरी भूमिका साकारली असून काजोल पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते. भिन्न स्वभावाच्या जुळ्या बहिणींच्या आयुष्यातील रहस्य, संघर्ष आणि धाडस यांची ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

हेही वाचा:

