Last Updated:
सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण गावात दरड कोसळून दुर्घटना झाली होती, ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावात भीतीचे वातावरण असल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून गावकऱ्यांना तातडीने गाव रिकामे करण्याचे आदेश दिले.
लोणावळा: एकीकडे आभाळ फाटल्याने ओढवलेले नैसर्गिक संकट, डोळ्यांदेखत तिघांचा गेलेला जीव आणि दुसरीकडे याच आपत्तीचा गैरफायदा घेणारी चोरांची क्रूर टोळी..मावळ तालुक्यातील पाटण गावातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दरड कोसळण्याच्या भीतीने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावकऱ्यांनी घरे रिकामी केली. पण त्याच ओस पडलेल्या गावाचा फायदा उठवत चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल १९ घरांवर दरोडा टाकला. लाखोंची रोख रक्कम, दागिने आणि थेट संसारोपयोगी साहित्यही चोरट्यांनी लंपास केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण गावात दरड कोसळून दुर्घटना झाली होती, ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावात भीतीचे वातावरण असल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून गावकऱ्यांना तातडीने गाव रिकामे करण्याचे आदेश दिले. जीवाच्या भीतीने गावकऱ्यांनी आपल्या घरांना कुलपे लावली आणि घाईघाईत सुरक्षित स्थळी आसरा घेतला. संपूर्ण गाव ओस पडल्याची खात्री होताच, बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन गावात प्रवेश केला. त्यांनी एकामागून एक तब्बल १९ घरांचे दरवाजे, कड्या, कोयंडे आणि खिडक्यांच्या काचा तोडून आत प्रवेश केला आणि चोरीचा सपाटा लावला.
चोरीची माहिती मिळताच जेव्हा ग्रामस्थांनी गावात धाव घेतली, तेव्हा घरांची झालेली दुरवस्था पाहून त्यांचा संयम सुटला. हक्काचे घर सोडल्याचे दुःख ताजे असतानाच, साठवलेली पुंजीही गेल्याने ग्रामस्थ पुरते कोलमडले आहेत. प्रशासनाचा मान राखून आम्ही आमची घरे सोडून बाहेर गेलो. मग आमच्या मागे आमच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का? गावात किमान दोन पोलीस कर्मचारी जरी गस्तीला ठेवले असते, तरी आज आमच्यावर ही वेळ आली नसती. आता आम्ही जगायचे कसे? असा सवाल ग्रामस्थांनी केला.
पाटण गावातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत गावात २४ तास पोलीस तैनात करण्यात यावेत. चोरी झालेल्या आणि दरडीमुळे नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी. तसेच नैसर्गिक आपत्तीचा आणि लोकांच्या हतबलतेचा फायदा घेणाऱ्या नराधम चोरांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Pune,Maharashtra
पुणे : भयंकर! दरड कोसळल्यानं गावऱ्यांनी सोडली घरं; पण रात्रीच्या अंधारातच ओसाड गावात घडली हादरवणारी घटना
