‘सैराट’मधल्या सल्याच्या व्हिडीओनंतर FDA ची तडकाफडकी मोठी कारवाई – Marathi News | Fda took action against solapur noble hospital medical after sairat fame arbaj shaikh allegations tukaram mundhe


तुकाराम मुंढे, अरबाज शेखImage Credit source: Instagram

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अरबाजने या व्हिडीओमध्ये सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत. त्याच्या या आरोपांनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल होत त्यांनी तडकाफडकी कारवाई केली आहे. हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलचं मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलमधल्या मेडिकलची तपासणी करण्यात आली आहे.

सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने आम्ही कारवाई करतोय, अशी माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी दिली. “प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. अशा अनेक त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे आम्ही मेडिकल सील करणार आहोत. रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक हे हॉस्पिटलच्या मेडिकलव्यतिरिक्त इतर कुठूनही औषधांची खरेदी करू शकतात, असा फलक इथे कुठेच लावलेला नाही. आयुक्तांच्या परिपत्रकाचं उल्लंघन झालेलं आहे. यासंदर्भातील पुरावे आम्ही तपासादरम्यान गोळा केले आहेत. लोकांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने या गोष्टी अत्यंत घातक आहेत. त्यामुळे मी इथे तात्काळ या मेडिकलला औषध विक्री बंद करण्याचे आदेश देत आहे,” असं ते म्हणाले.

वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने अरबाजने त्यांना सोलापुरातल्या या रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधांची खरेदी करण्याची सक्ती केल्याचा आरोप त्याने व्हिडीओमध्ये केला होता. वडिलांच्या औषधांचं बिल या मेडिकलमध्ये 40 हजार रुपये आलं, तेच बाहेर 20 हजारांपर्यंत आलं असतं, असंही तो म्हणाला. खाजगी रुग्णालयाकडून अशा प्रकारची लूट सुरू असल्याचं म्हणत त्याने मदतीची विनंती केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एफडीएकडून तातडीने कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांसाठी आत असलेल्या फार्मसीकडूनच औषधं आणि वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा इशारा दिला होता.

अरबाजच्या आरोपांनंतर रुग्णालयाच्या प्रमुखांनी त्यांची बाजू मांडली होती. “औषधं आमच्याकडूनच घेण्याबाबत आम्ही कधीही कोणालाही अनिवार्य करत नाही. मुळात दोन दिवसांपूर्वीच त्या रुग्णाने डिस्चार्ज घेतला आहे. मात्र तरीही त्यांनी असे आरोप का केले, याबाबत कल्पना नाही. तसंच रुग्णाच्या एकूण खर्चाबाबत आम्ही त्यांना आधीच कल्पना दिलेली होती”, अशी प्रतिक्रिया नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद सय्यद यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *