IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आणखी एक मालिका पराभव, इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकलीImage Credit source: BCCI
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. चौथ्या सामन्यानंतर भारताने मालिका 3-0 ने गमावली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताची हाराकिरी सुरूच आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने गमावली होती. आता पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर गमावली आहे. श्रेयस अय्यर नाणेफेकीच्या बाबतीत लकी ठरला. पण विजय काही मिळाला नाही. अपेक्षेप्रमाणे कौल लागून आणि हवा तो निर्णय घेऊनही विजय मिळवता आलेला नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात हा पाचवा पराभव ठरला आहे. चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फेल गेले. कर्णधार श्रेयस अय्यरने 49 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार मारून नाबाद 80 धावा केल्या. पण त्याच्या या खेळीने काही विजय मिळवता आला नाही. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 158 केल्या आणि विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने 1 गडी गमवून पूर्ण केलं.
इंग्लंडचा डाव
भारताने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचा पाठलाग इंग्लंडला पहिला धक्का 13 धावांवर बसला. जोस बटलर 8 चेंडू 8 धावा करून बाद झाला. अर्शदीप सिंगने ही विकेट काढली. पण त्यानंतर फिलिप सॉल्ट आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांनी सळो की पळो करून सोडलं. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी विजयी भागीदारी केली. या दोघांच्या प्रत्येक चौकार आणि षटकारनंतर भारताचा पराभव निश्चित होत गेला. फिलिप सॉल्टने 42 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने 35 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 चेंडूत नाबाद 146 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने 37 चेंडू आणि 9 गडी राखून भारताला पराभूत केले.
भारताचा डाव
भारताकडून श्रेयस अय्यर वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. वैभव सूर्यवंशी 15, अभिषेक शर्मा 16, इशान किशन 4, शिवम दुबे 22. तिलक वर्मा 11, वॉशिंग्टन सुंदर 5 आणि अक्षर पटेल 1 धाव करून बाद झाला. श्रेयस अय्यर वगळता संघातील उर्वरित फलंदाज मिळून त्याच्या धावसंख्येची बरोबरी करू शकले नाहीत. संघातील उर्वरित फलंदाजांनी मिळून या सामन्यात फकत 74 धावा केल्या. यात 4 धावा अतिरिक्त म्हणून आल्या.