Last Updated:
अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही तालुक्यांतील एकूण 13 रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांतील वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही तालुक्यांतील एकूण 13 रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी हा आदेश जारी केला आहे.
गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभरात हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी, ओढे आणि बंधाऱ्यांवरील अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. अनेक ठिकाणचे रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. जुन्नर-आंबेगावमधील 13 रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पावसाचा जोर कायम असल्याने जुन्नर तालुक्यातील अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जुन्नर–बेळेआळी ते लेण्याद्री पूल, बस्ती–सावरगाव पूल, निमगाव–निमदरी पूल, जुन्नर–वडज पूल, नारायणगाव–वारुळवाडी (नेवकर) पूल, नारायणगाव–वारुळवाडी (मेहेर) पूल, खोडद–रांजणी पूल तसेच हिवरे तर्फे नारायणगाव येथील बंधाऱ्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
आंबेगाव तालुक्यातही पावसाचा मोठा फटका बसला आहे. लाखणगाव येथील घोडनदीवरील पूल (बेल्हा–जेजुरी महामार्ग), भराडी येथील बंधारा रस्ता, डिंभे–बोरघर रस्ता, डिंभे–भीमाशंकर रस्ता तसेच अडिवरे–अहुपे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
सातत्याने पूरस्थितीचा आढावा घेतला जात असून, पाणी ओसरल्यानंतर आणि परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतर संबंधित रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी बंद करण्यात आलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Pune,Maharashtra
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील 13 रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद!
