Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत एक इमारत कोसळली आहे. या इमारतीत चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोशी कचरा डेपोला लागून ही इमारत आहे. अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याच्या डोंगर इमारतीवर आला. त्यामुळं ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुसरीकडे, पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यासह निवासी भागांतही पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना आणि नोकरदारांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या विशेषतः सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरासाठी पुढील २४ ते ४८ तासांकरिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात अत्यंत मुसळधार तर शहरी भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि जुनाट इमारती, झाडे तसेच वीज वाहक तारांपासून दूर राहावे, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या