Drishyam 2 fame actor Financial Loss: पडद्यावर आपल्या दमदार नकारात्मक भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची ओळख निर्माण करणारे अभिनेते कमलेश सावंत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यातील मोठा आर्थिक फटका बसल्याचा अनुभव सांगितला. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ मधील गायतोंडे ही त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र पडद्यावर कठोर वाटणारे कमलेश सावंत प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत मृदू स्वभावाचे असल्याचं त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. याच स्वभावामुळे तब्बल 70 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा खुलासा त्यांनी केला.
“पैशांसाठी कुणाच्या मागे लागत नाही”
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये बोलताना कमलेश सावंत यांनी सांगितलं की, पडद्यावर त्यांनी कितीही खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी प्रत्यक्ष आयुष्यात ते कोणालाही पैशांसाठी वारंवार फोन करून त्रास देत नाहीत असं त्यांनी सांगितलं. एखाद्या व्यक्तीला एक-दोन वेळा पैशांची आठवण करून दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर ते तो विषय तिथेच सोडून देतात. याच सवयीचा फटका त्यांना अनेकदा बसला. अनेक ठिकाणी दिलेले पैसे परत न मिळाल्याने आजवर सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे पैसे वेळेत परत मिळाले असते, तर आज स्वतःच्या घरावरील कर्जाचा भार नसला असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक नुकसान झाल्यानंतरही त्याबाबत कटुता न ठेवण्याचा आपला स्वभाव असल्याचं कमलेश यांनी स्पष्ट केलं. एखाद्या व्यक्तीला दोनदा सांगितल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत, तर तिसऱ्यांदा ते आग्रह धरत नाहीत. “देत असाल तर द्या, नाहीतर राहू द्या,” अशी भूमिका ते घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे गेलेले पैसे आपल्या नशिबातच नव्हते, असंच ते मानतात.
दिग्दर्शकाच्या मुलाने केला थकीत पैशांचा उल्लेख, पण कमलेश यांनी दिला नकार
मुलाखतीत त्यांनी एक भावनिक प्रसंगही सांगितला. 2006 मध्ये एका चित्रपटाचं काम केल्यानंतर त्यांचं काही मानधन बाकी राहिलं होतं. संबंधित निर्मात्यांच्या निधनानंतर काही वर्षांनी त्यांच्या मुलाने कमलेश यांच्याशी संपर्क साधत थकीत रकमेची माहिती विचारली.मात्र कमलेश यांनी त्याला स्पष्ट शब्दांत सांगितलं की, व्यवहार त्याच्या वडिलांशी झाला होता, मुलाशी नाही. त्यामुळे त्या पैशांची मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही. वडिलांचं कर्ज मुलांनी फेडावं, या विचारसरणीशी आपण सहमत नसल्याचंही कमलेश म्हणाले.
वडिलांकडून मिळालेले संस्कार
या प्रसंगाचा उल्लेख करताना कमलेश सावंत म्हणाले की, कोणावर आर्थिक ओझं टाकू नये, हा स्वभाव आणि विचार त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. म्हणूनच नुकसान झालं तरी ते त्याबद्दल कोणाविषयी कटुता बाळगत नाहीत. पडद्यावर खलनायकाची भूमिका गाजवणारा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र माणुसकी आणि मूल्यांना अधिक महत्त्व देतो, हे त्यांच्या या अनुभवातून पुन्हा एकदा समोर आलं.