Mumbai Rain Local Train Updates Marathi News: राज्यातल्या काही भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, पालघर, रायगड या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. (Maharashtra Weather News)
हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक आणि पुण्याच्या ग्रामीण भागांमधील शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि संभाव्य पाणी साचण्याची स्थिती पाहता जिल्हा प्रशासने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईत सतत पडत असलेल्या पावसाच्या सरींनी घेतली विश्रांती- (Mumbai Rain Updates)
मुंबईत सतत पडत असलेल्या पावसाच्या सरींनी सध्या विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे. आज ही मुंबईला ऑरेंज अलर्टचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर असे सांगण्यात आले आहे, त्यापार्श्वभूमीवर नागरिकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पाऊस थांबला असला तरीही पावसाचे ढग दाटलेले आहेत. मिठी नदी पूर्णत: भरलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, पावासाचा फटका मुंबईतील तिन्ही लोकल मार्गिकेला बसला होता. आज लोकल वाहतुकीची काय परिस्थिती जाणून घ्या…(Mumbai Rain Local Train Updates)
पालघर जिल्ह्यात पूर, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान- (Palghar Rain News)
पालघर जिल्ह्याला काल पावसाने अक्षरशा झोडपून काढलं. जिल्ह्यातील वसई विरार, सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, मनोर तसेच वाडा भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने या भागातील नदी नाले ओसंडून वाहत होते. खानिवडे वरून वाहणारी तानसा नदीने धोक्याची पातळीवर आणली होती. त्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये पाणी शिरून काही घरांमध्येही पाणी शिरलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झालेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे मनोर जवळून वाहणारी वैतरणा नदीलाही मोठा पूर आला होता. त्यामुळे या भागातही काही रस्त्यांवर पाणी साचलं होतं तर गावांमध्ये पाणी शिरलं होतं. वाडा भागातील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं होतं. या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला. तर रस्ते वाहतुक काही ठिकाणी बंद करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथे महामार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराचा पूर उतरल्यामुळे महामार्गाला नदीच्या स्वरूप आलं होतं. एकूणच पाहायला गेलं तर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळालं.
पश्चिम रेल्वे- (Western Railway Local Train Latest Updates Marathi News)
पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरु आहे. तर काल दिवसभर वसई आणि विरार दरम्यान लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ती आज पूर्ववत झाली आहे. मुसळधार पावसामुळे वसई रोड आणि विरार दरम्यान काही काळ विस्कळीत झालेली मुंबई लोकल ट्रेन सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे. वसई आणि विरार दरम्यान, ट्रॅकवर अजूनही पाणी साचलेलं आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच डहाणू आणि विरारपर्यंतची लोकल सेवेबाबत अजूनही काहीच अपडेट्स देण्यात आलेले नाही.
मध्य रेल्वे- (Central Railway Local Train Latest Updates Marathi News)
मध्य रेल्वेवरील लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरु आहे.
हार्बर रेल्वे- (Harbour Railway Local Train Latest Updates Marathi News)
हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे.
नाशिकमध्ये आज ढगफुटी होण्याची शक्यता- (Nashik Rain Updates)
मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नाशिकमध्ये आज ढगफुटी होण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना वर्क फ्रॉम होमबाबत प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण अलर्ट देतो तेव्हा ही अपेक्षा आहे की सगळे त्याला योग्य प्रतिसाद देतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी अत्यावश्यक सेवा सोडून सर्वांना सुट्ट्या दिल्या आहेत..पण तरीही जर कुठे कार्यालयात बोलवण्यात येत असेल तर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी: