Last Updated:
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना आता नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली आहे. इथं एका भोंदूबाबाने जादूटोण्याची भीती दाखवत एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण उघडकीस आलं होतं. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केला होता. आरोपीनं पीडित महिलांना अघोरी पूजा आणि विधी करण्याच्या नावाखाली त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं. याबाबतचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना ताजी असताना आता नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली आहे.
इथं एका भोंदूबाबाने जादूटोण्याची भीती दाखवत एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं पीडित महिलेला आणि तिच्या मुलाला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित महिलेनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत भोंदूवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सायखेडा पोलिसांनी दारणा सांगवी येथील संशयित भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड याला अटक केली आहे.
व्यवसायातील अडचणीचा गैरफायदा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पंचवटी परिसरात चहाचं दुकान चालवते. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नसल्यामुळे, तिच्या परिचयातील काही व्यक्तींनी तिला भोंदूबाबा यौवन गोहाडकडे जाण्याचा सल्ला दिला. याचाच गैरफायदा घेत गोहाडने पीडितेची फसवणूक करण्यास सुरुवात केली.
त्याने मंत्रलेले तांदूळ आणि जडीबुटी देऊन व्यवसायात मोठी भरभराट होईल, असं खोटं आश्वासन दिलं. यासाठी त्याने सुरुवातीला पीडितेकडून ३,००० रुपये उकळले. त्यानंतर, विविध प्रकारची भीती दाखवून त्याने महिलेवर वारंवार बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, आधीच पहिलं लग्न झालेलं असतानाही संशयित भोंदूबाबाने या पीडित महिलेशी जबरदस्तीने विवाह केला.
३ वर्षे छळ आणि खुनाचा प्रयत्न
लग्नानंतर तब्बल तीन वर्षे पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. हा अत्याचार इथेच थांबला नाही; काही दिवसांपूर्वी या भोंदूबाबाने पीडित महिला आणि तिच्या अवघ्या एक वर्षाच्या निष्पाप मुलाचा गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या जीवघेण्या प्रसंगातून स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर पीडितेने थेट ‘अंनिस’च्या (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.
जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी पीडितेला घेऊन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या थेट निर्देशानुसार, सायखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Nashik,Maharashtra
