Last Updated:
Ban on Drinking Indrayani River Water: नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी सार्वजनिक नळावरील पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सचिन तोडकर, प्रतिनिधी, (उत्तर पुणे)– आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. वारी कालावधीत इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास आणि स्वयंपाकासाठी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दिनांक ०८ जुलै रोजी होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास किंवा स्वयंपाकासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नदीपात्रात कपडे धुणे किंवा नदीचे पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वारकऱ्यांनी सार्वजनिक नळावरील पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा
नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी सार्वजनिक नळावरील पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
पालखी सोहळ्याला प्रारंभ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून परिस्थितीचा आढावा
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच उद्यापासून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दूरध्वनीद्वारे प्रशासनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे आयुक्त, पोलीस प्रशासन तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या, आवश्यक ती तत्काळ उपाययोजना करण्याच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.
पुणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या विशेष सूचना
जिल्ह्यात अनेक ठिकाणी 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड पडल्याच्या घटना घडल्या आहेत अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी प्रशासन ऑन फिल्ड काम करत आहे. मावळ तालुक्यात दुर्दैवाने आणि काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात पावसाने 2 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. ठिकठिकाणी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत. मावळ आणि खेड तालुक्यात अनेक लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याला आज रेड तर उद्या ऑरेंज अलर्ट आहे. लोकांनी बाहेर पडणे टाळावे. थोड्याच वेळात कनेक्टिंग लिंक वरचे काम पूर्ण होईल आणि वाहतूक सुरळीत होईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
Pune,Maharashtra
