कंडोमच्या जाहिरातीमुळे मोठा वाद, क्रिकेटचा सामना सुरू असतानाच…थेट ICC ला पत्र; नेमकं काय घडलं? – Marathi News | Ban condom dating apps ad between cricket match letter to jay shah


Condom AD In Cricket Match : क्रिकेट या खेळावर भारतातील करोडो लोकांचा जीव आहे. भारताचा क्रिकेट सामना असला की एका वेळी कोट्यवधी लोक तो सामना पाहात असतात. यात वयोवृद्धांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंतच्या प्रेक्षकांचा समावेश असतो. दरम्यान, हीच बाब लक्षात घेता क्रिकेटच्या सामन्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या, डेटिंग अॅपच्या जाहिरातींवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे पत्रच आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांना देण्यात आले आहे.

नेमकी काय मागणी करण्यात आली?

चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (सीटीआय) आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात क्रिकेटचे सामने चालू असताना ब्रॉडकास्टरकडून दाखवल्या जाणाऱ्या अडल्ट श्रेणीत मोडणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. सीटीईचे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी हे पत्र लिहिले आहे. फॅमिली व्ह्यूइंग टाईमच्या दरम्यान कंडोम, डेटिंग अॅप तसेच अन्य अडल्ट श्रेणीत मोडणाऱ्या जाहिरातींचे प्रसारण थांबवावे असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे.

सीटीआयच्या पत्रात नेमके काय आहे?

सीटीआयने आपल्या पत्रात सविस्तर मत मांडलं आहे. देशातील साधारण 44 कोटी लोक क्रिकेटचे सामने ऑनलाईन पद्धतीने पाहतात. यात 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लहान मुलांचाही समावेश असतो. काही लोक संपूर्ण कुटुंबासह क्रिकेटचे सामने पाहात असतात. अशा स्थितीत कंडोम, डेटिंग अॅप तसेच अन्य अडल्ट श्रेणीत मोडणाऱ्या जाहिराती दाखवल्याने अडचण निर्माण होते, असे या पत्रात म्हणण्यात आले आहे.

तर ब्रॉडकास्टरवर कारवाई करा

तसेच क्रिकेटचे सामने चालू असताना रात्री सात ते 11 वाजेपर्यंतच्या फॅमिली व्ह्यूइंग टाईममध्ये प्रसारित होणाऱ्या कंडोम,डेटिंग अॅप तसेच अडल्ट श्रेणीतील जाहिरातींवर बंदी घालावी. तशा प्रकारच्या स्पष्ट सूचना द्याव्यात. ब्रॉडकास्ट पार्टनर्ससोबत होणाऱ्या करारात फॅमिली व्ह्यूइंग टाईमचा स्पष्ट उल्लेख असावा. अडल्ट श्रेणीतील जाहिराती सुरू दाखवल्या गेल्यास ब्रॉडकास्टर्सवर कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयसीसी यावर नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *