ना मागे जाईना, ना पुढे येईना…. मनोरी किनाऱ्यालगत खडकात कार्गो जहाज अडकले, जहाज कुठलं ते ही कळेना! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Ship Stranded Near Manori Beach: संबंधित जहाज अनोळखी असून त्या भागातील खडकांची माहिती नसल्याने ते खडकात अडकले असावे, असे स्थानिक मच्छिमारांनी सांगितले.

कार्गो जहाज अडकलं
कार्गो जहाज अडकलं

विजय वंजारा, प्रतिनिधी, पुणे: मुंबईतील गोराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोरी बंदर परिसरात, हिंदू स्मशानभूमीपासून सुमारे २०० ते २५० मीटर अंतरावर एक कार्गो जहाज खडकात अडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून विविध सागरी सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पाहणी केली असता जहाज भरकटलेल्या अवस्थेत खडकात अडकलेले दिसून आले. जहाजावर कोणत्याही व्यक्तीची हालचाल आढळली नाही. तसेच जहाजावर नाव किंवा ओळख पटेल अशी कोणतीही स्पष्ट निशाणी अथवा क्रमांक दिसून आला नाही.

लहान बोटीने जहाजापर्यंत पोहोचणे धोकादायक

स्थानिक मच्छीमार आकाश बंदरकर यांनी पोलिसांना सांगितले की, संबंधित जहाज अनोळखी असून त्या भागातील खडकांची माहिती नसल्याने ते खडकात अडकले असावे. सध्या सुरू असलेली अतिवृष्टी, समुद्रातील उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यांमुळे लहान बोटीने जहाजापर्यंत पोहोचणे धोकादायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 जहाज कुठलं ते ही कळेना! यंत्रणा सतर्क

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोराई पोलिसांनी सागरी पोलीस, जॉइंट ऑपरेशन सेंटर (JOC), महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, भारतीय नौदल, मत्स्यव्यवसाय विभाग, कस्टम विभाग, SID, चारकोप ATC, भारतीय तटरक्षक दल (Coast Guard) तसेच INS हमला यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांना माहिती दिली आहे.

मनोरी हिंदू स्मशानभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

दरम्यान, जहाजावर आणि परिसरावर सतत लक्ष ठेवण्यासाठी मनोरी हिंदू स्मशानभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढील घडामोडींवर संबंधित यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *