सावधान! ‘आळंदीत येऊ नका’; वारकऱ्यांना प्रशासनाचं आवाहन, इंद्रायणीचे ४ ही पूल पाण्याखाली | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

गेल्या दोन दिवसांपासून आळंदी आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

आळंदीत पूरस्थिती
आळंदीत पूरस्थिती

आळंदी: आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आणि वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून आळंदी आणि परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थान, पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन केले आहे.

इंद्रायणी घाट बंद

मुसळधार पावसामुळे आळंदीतील अनेक पूल, रस्ते आणि काही धर्मशाळा पाण्याखाली गेल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रसिद्ध इंद्रायणी घाट भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सध्या आळंदी शहरात प्रवेश करणे कोणत्याही दृष्टीने सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाचे वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन

ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन ज्या ठिकाणी आहात, त्याच ठिकाणी सुरक्षित आश्रय घेऊन थांबावे. सध्यातरी आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच भाविकांनी नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांच्या दिशेने जाणे पूर्णपणे टाळावे. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता, केवळ प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असंही सांगण्यात आलं आहे.

प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर

“वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा, पालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अहोरात्र आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत. सर्व भाविकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे.”

– आळंदी देवस्थान व नगरपरिषद प्रशासन

मराठी बातम्या/पुणे/

सावधान! ‘आळंदीत येऊ नका’; वारकऱ्यांना प्रशासनाचं आवाहन, इंद्रायणीचे ४ ही पूल पाण्याखाली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *