त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो; संजय राऊत यांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर खोचक टीका – Marathi News | Sanjay raut took an indirect swipe at deputy cm eknath shinde wishing him recovery while criticizing greed


गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी, त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो, पापाचा पैसा तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही असे नाव न घेता म्हटले आहे.

नाव न घेता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, टॉलस्टॉयचा म्हातारा टांगा चालवायचा. तेव्हा रिक्षा नव्हती. तेव्हा तो टांगा चालवायचा. ही गोष्ट आहे. जीविका करायचा. मी मनाचं सांगत नाही. ते आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो. त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो. तुमच्या हातात सत्ता आहे. पैसा आहे. यंत्रणा आहे. राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. यातूनच देणग्या घेऊन कार्यक्रम केला. हा पापाचा पैसा पचणार नाही. हा पैसा त्यांना आणि तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही. टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्याप्रमाणे दोन फूट जमिनीत कोसळणार आहे.

खासदार फुटीवर संजय राऊत काय म्हणाले?

पुढे ते म्हणाले, तुम्ही आमदार आणि खासदार फोडत आहात. कार्यकर्ते फोडत आहेत. पैसे देत आहात. लिंगाडे नावाच्या आमदाराला २० कोटी ऑफर दिली. माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला मग हॉस्पिटलमध्ये जाऊन स्ट्रेसमुळे अॅडमिट व्हावं लागत आहे. हे करू नका. थांबा कुठे तरी. थांबलं पाहिजे. त्यामुळे ती टॉलस्टॉयची गोष्ट आहे. आजचे राजकारणी वाचत नाही.म्हणून ती वाचावी. तुमच्या माध्यमातून समजून घ्यावी. आणि पूर्ण विराम तयार करावा. नाहीतर अंत आपोआप होईल.

बोलताना सुरुवातीलाच संजय राऊत म्हणाले की, टॉलस्टॉय हा फार मोठा लेखक होता. तत्त्वचिंतक होता. रशियातील. भविष्यातील वेध घेण्याची शक्ती त्याच्या लिखाणात होती. त्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. जास्त हावरटपणा, हव्यास किंवा फाजील महत्त्वकांक्षा ठेवली तर त्याचा अंत काय होतो हे टॉलस्टॉयने त्याच्या कथेत सांगितलं. त्याच्या कथेतील म्हाताऱ्याला संपत्ती आणि जमिनीचा हव्यास लागला. जमीन मिळवण्याची एवढी भूक लागली. त्यामुळे तो दिवसभर जमिनीसाठी धावत राहिला. तो प्रचंड धावला. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढा चालशील तेवढी त्याची जमीन. पण तो चालला नाही. तो धावला. त्याला जास्त जमीन हवी होती. तो दुपारी जेवला नाही. पाणी प्यायला नाही. पण तो धावतच राहिला. शेवटी तो पडला. आजारी पडला. त्याला ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं. तरी तो धावत राहिला. तो वेशीवर येऊन पडला. शेवटी त्याला काहीच मिळालं नाही. दो गज जमीन त्याच्या नशिबीसाठी आली. हे सर्व राजकारण्यांसाठी आहे. फडणवीस, शिंदे, मोदी आणि शहा सर्वांसाठी आहे. माणसाने कुठं थांबायचं हे ज्याला कळत नाही. त्याचा अंत फार वाईट होतो. हा जगातला नव्हे तर रामायण असेल, महाभारत असेल, बायबल असेल कुराण असेल कोणत्याही धर्मातील हे तत्त्व आहे. तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी होत नाही. तोपर्यंत समाधान होत नाही. हे त्यातील एक तत्त्व आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *