Mumbai Mankhurd News: मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 5 निष्पाप चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच दुर्दैवी अंत, महापौर रितू तावडे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल


Mumbai Mankhurd News : राज्यभरासह मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार बघायला मिळा आहे. अशातच मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे (Mumbai Mayor Ritu Tawde) यांनी गोवंडी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. तर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखी घटनास्थळी भेट दिली. यावेळी धोकादाय इमारतींची चौकशी होणार, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. (Mumbai Mankhurd Home Collapsed News)

Mumbai Mankhurd News : मानखुर्दमध्ये रविवारी रात्री नेमकं काय घडलं?

मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात काल, रविवार (5 जुलै 2026) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जावून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार अबू आझमी, रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते.

प्रथमदर्शनी प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास मानखुर्द मध्ये हनुमान मंदिराजवळील, जनता नगर मधील चाळ क्रमांक 5 मधील तळमजला अधिक तीन मजले असलेल्या 2 ते 3 झोपड्या/ कच्ची घरे कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली रहिवासी अडकले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे समन्वयन करीत आहेत. या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल एक महिला, 3 लहान मुली आणि एक लहान मुलगा अशा पाचही जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात एक लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि एक तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी महापौरांना दिली.

Girish Mahajan: घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, धोकादाय इमारतींची चौकशी होणार 

मानखुर्दच्या जनता नगरमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी नाशिकहून थेट घटनास्थळी पोहोचलो असून परिस्थितीची पाहणी केली. या परिसरात अत्यंत अरुंद गल्ल्या असून एकावर एक मजले चढवून घरे बांधण्यात आली आहेत. तळमजल्यावरील सुमारे 12 बाय 12 फुटांच्या घरांवर तीन-तीन मजले उभारण्यात आले आहेत. ही बहुतांश बांधकामे अनधिकृत स्वरूपाची आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. मात्र, प्रचलित नियमांनुसार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाऊ शकते. शिवाय धोकादाय इमारतींची चौकशी होणार, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *