PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल


मुंबई : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आपल्या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी तसेच सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या आणि अनोख्या शैलीचा वापर करत असतात. असाच काहीसा प्रकार शनिवारी गुजरातमध्ये पाहायला मिळाला. गुजरातच्या साणंद येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी थेट ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधील ‘सुन रहे हो न, विनोद’ (Sun Rahe Ho Na Vinod) या डायलॉगचा वापर केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

साणंद येथे ‘सीजी सेमी आऊटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट’ (CG Power Semiconductor) या अत्याधुनिक सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या ‘सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स’चे चेअरमन वेल्लायन सुबैया यांनी आपल्या भाषणात दोन गुजराती म्हणींचा वापर केला होता. त्याचाच धागा पकडत पीएम मोदींनी आपल्या खास शैलीत हा संवाद फेकला, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

PM Narendra Modi Speech : लक्ष्य कधीही छोटं ठेवत नाही

या कार्यक्रमात बोलताना उद्योजक वेल्लायन सुबैया म्हणाले होते की, “सरकारची विकासाची दृष्टी अत्यंत स्पष्ट आहे, आता उद्योग जगताने त्या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे. लक्ष्य चुकणे माफ केले जाऊ शकते, पण लहान लक्ष्य ठेवणे कधीही माफ केले जाऊ शकत नाही.”

सुबैया यांच्या या विधानाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, “सुबैया म्हणाले त्याप्रमाणे मी कधीही छोटं लक्ष्य ठेवत नाही आणि छोटी विचारसरणीही ठेवत नाही. मी पुतळा बनवला (Statue of Unity) तो देखील जगातील सर्वात मोठा.”

PM Modi Panchayat Meme : मोदींच्या डायलॉगची सोशल मीडियावर चर्चा

सुबैया यांच्या या ‘काम बोले छे’ या म्हणीला जोड देत पंतप्रधान मोदींनी थेट मिश्किल टिप्पणी केली. मोदी म्हणाले, “सुबैया जी म्हणाले की ‘काम बोले छे’… ‘सुन रहे हो न, विनोद’… काम बोलतंय.” मोदींच्या तोंडून हा लोकप्रिय सोशल मीडिया मीम (Meme) डायलॉग ऐकताच मंचावरील मान्यवरांसह संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला आणि लोकांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.

पंतप्रधान मोदींनी या भाषणातून त्यांच्या सरकारने स्वदेशी सेमीकंडक्टर उद्योगाची स्थापना करण्यासाठी केलेल्या मोठ्या कामगिरीवर प्रकाश टाकला. ‘पंचायत’ या वेब शोमधील ‘सुन रहे हो न, विनोद’ हा संवाद इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय आहे आणि अनेकदा मीम्स बनवण्यासाठी वापरला जातो. आता थेट देशप्रधानांकडूनच हा डायलॉग मारला गेल्याने सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ही बातमी वाचा: 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *