Shield Multi Cancer Detection Test: भारतात कॅन्सर (Cancer) हे आरोग्यापुढील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक बनले आहे. अनेकदा कॅन्सरची लक्षणे दिसायला लागल्यावर, म्हणजेच अगदी शेवटच्या टप्प्यात या आजाराचे निदान होते, ज्यामुळे उपचारात मोठ्या अडचणी येतात. परंतु, आता कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे. अहमदाबादस्थित ‘झायडस लाइफसायन्सेस’ (Zydus Lifesciences) ने ‘अपोलो हॉस्पिटल्स’ (Apollo Hospitals) सोबत भागीदारी करून भारतात ‘शील्ड मल्टी-कॅन्सर डिटेक्शन’ (Shield Multi-Cancer Detection – MCD) ही अत्याधुनिक रक्त तपासणी उपलब्ध करून दिली आहे. या अत्याधुनिक चाचणीच्या माध्यमातून केवळ एकाच वेळेस घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यावरून (Single Blood Draw) तब्बल 10 प्रकारच्या सामान्य कॅन्सरचा शरीरातील धोका ओळखता येऊ शकणार आहे.
Shield Multi Cancer Detection Test: भारतात पहिल्यांदाच आले हे तंत्रज्ञान
अमेरिकेतील प्रसिद्ध प्रिसिजन ऑन्कोलॉजी कंपनी ‘गार्डंट हेल्थ’ (Guardant Health) ने ही ‘मल्टी-कॅन्सर अर्ली डिटेक्शन’ (MCED) टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. भारतात ही तंत्रज्ञानयुक्त चाचणी उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तज्ज्ञांच्या मते, ही चाचणी कॅन्सर स्क्रीनिंगच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकते, मात्र ही नियमित पारंपारिक चाचण्यांना पूर्ण पर्याय नाही, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Shield Multi Cancer Detection Test: काय आहे ‘Shield MCD’ टेस्ट?
ही चाचणी प्रामुख्याने 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या अशा प्रौढ व्यक्तींसाठी आहे, ज्यांना कॅन्सर होण्याचा सामान्य धोका असू शकतो. ही टेस्ट एखाद्या विशिष्ट कॅन्सरचा शोध घेत नाही, तर रक्तातील डीएनएच्या छोट्या तुकड्यांमधील रासायनिक बदलांचा म्हणजेच ‘मेथिलेशन पॅटर्न’चा अभ्यास करते. जेव्हा कॅन्सर पेशी रक्तात डीएनए सोडतात, तेव्हा हे तंत्रज्ञान ते ओळखते. Advanced Genomics आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ही टेस्ट शरीरातील असामान्य डीएनए सिग्नल्स शोधून काढते आणि कॅन्सर शरीराच्या कोणत्या भागात निर्माण होत आहे, याचा अंदाज लावते.
Shield Multi Cancer Detection Test: या 10 कॅन्सरचा लावणार छडा
स्तन कॅन्सर (Breast Cancer)
फुफ्फुसाचा कॅन्सर (Lung Cancer)
कोलोरेक्टल/मोठ्या आतड्याचा कॅन्सर (Colorectal Cancer)
यकृताचा कॅन्सर (Liver Cancer)
स्वादुपिंडाचा कॅन्सर (Pancreatic Cancer)
गर्भाशयाचा कॅन्सर (Ovarian Cancer)
प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer)
मूत्राशयाचा कॅन्सर (Bladder Cancer)
पोटाचा कॅन्सर (Gastric/Stomach Cancer)
अन्ननलिकेचा कॅन्सर (Oesophageal Cancer)
Shield Multi Cancer Detection Test: पारंपारिक चाचण्यांपेक्षा कशी वेगळी आहे?
सध्या उपलब्ध असलेल्या पारंपरिक पद्धतींमध्ये एका वेळी एकाच कॅन्सरची तपासणी करता येते. जसे की,स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी (Mammography), आतड्याच्या कॅन्सरसाठी कोलोनोस्कोपी (Colonoscopy), गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी पॅप स्मीअर (Pap Smear), फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी लो-डोज सीटी स्कॅन (Low-dose CT Scan)
याउलट, ‘शील्ड MCD’ टेस्ट एकाच ब्लड टेस्टद्वारे अनेक कॅन्सरचे सिग्नल्स शोधते, ज्यामुळे रुग्णाला मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होतो. मात्र, डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, या चाचणीचा रिझल्ट ‘पॉझिटिव्ह’ आला म्हणजे रुग्णाला कॅन्सर आहेच असे नाही. याचा अर्थ पुढील तपासण्या (Biopsy, Endoscopy किंवा Imaging Scans) करण्याची गरज आहे. तसेच, रिझल्ट ‘नेगेटिव्ह’ आला तरी कॅन्सरचा धोका संपूर्ण टळला असे होत नाही, त्यामुळे नियमित डॉक्टरी सल्ले घेणे आवश्यक आहे.
Shield Multi Cancer Detection Test: भारतासाठी ही टेस्ट का महत्त्वाची?
एका आकडेवारीनुसार, भारतात 2022 मध्ये 14 लाखांहून अधिक नवीन कॅन्सर रुग्णांची नोंद झाली होती, तर 9 लाख लोकांचा यामुळे मृत्यू झाला. भारतात कॅन्सरच्या स्क्रिनिंगच्या पुरेशा सुविधा नसल्याने अनेक रुग्णांचे निदान उशिरा होते. विशेषतः स्वादुपिंड, यकृत, पोट आणि ओव्हेरियन कॅन्सरसाठी कोणतीही नियमित स्क्रिनिंग पद्धत उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ही ब्लड टेस्ट वरदान ठरू शकते. एका आशियाई अभ्यासानुसार, या टेस्टने 79 टक्के प्रकरणांमध्ये कॅन्सरचे अचूक निदान केले असून 99.9 टक्के अचूकतेने कॅन्सर नसलेल्या व्यक्तींची ओळख पटवली आहे.
Shield Multi Cancer Detection Test: किंमत किती असणार?
भारतात या ‘Shield MCD’ टेस्टची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, ही चाचणी लवकरच अपोलो हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध होईल आणि देशभरात ‘डॉ. डॅंग्स लॅब’च्या माध्यमातूनही ती लोकांपर्यंत पोहोचवली जाण्याची शक्यता आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator