Last Updated:
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निशा चौहान यांची त्यांच्या पतीने चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हत्येनंतर पतीने स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निशा चौहान (वय 40) यांची शुक्रवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पतीने चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती प्रदीप चौहान (वय 42) याने स्वतःवरही चाकूने अनेक वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेनंतर घरातील मुलांनी आरडाओरडा करत घराबाहेर धाव घेतली. मुलांचा आवाज ऐकून शेजारी तातडीने घरात पोहोचले. त्यावेळी घराच्या फरशीवर निशा चौहान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या तर काही अंतरावर प्रदीप चौहान गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी निशा चौहान यांना मृत घोषित केले. प्रदीप चौहान यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात या हत्येमागे 1,170 चौरस फूट जमिनीच्या नोंदणीचा वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जमिनीची नोंदणी शुक्रवारीच होणार होती. निशा चौहान यांची इच्छा होती की ती जमीन त्यांच्या नावावर नोंदवली जावी. मात्र प्रदीप चौहान यांचा त्यास विरोध होता. याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि त्याचे रूपांतर या भीषण घटनेत झाले.
घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. पोलिसांनी घरातील मुलांची चौकशी केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ही घटना सरूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हर्रा कस्बा येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्रा कस्बा येथे निशा चौहान आपल्या पती प्रदीप चौहान, दोन मुलगे देव (वय 17), शुभ (वय 16) आणि मुलगी एंजेल (वय 12) यांच्यासोबत राहत होत्या. निशा चौहान ब्युटी पार्लर चालवत होत्या. त्यांना सोशल मीडियावर रिल्स तयार करण्याची विशेष आवड होती. इन्स्टाग्रामवर त्यांनी स्वतःचा परिचय रील क्रिएटर, ब्युटिशियन आणि अभिनेत्री असा दिला होता. तर प्रदीप चौहान एसी तंत्रज्ञ म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी पहाटे घरातून मोठ्या आवाजात भांडण आणि आरडाओरड सुरू होती. निशा आणि प्रदीप यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद सुरू होता. काही वेळातच त्यांची मुले घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर धावत आली आणि घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. त्यानंतर शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून निशा चौहान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
वाद सुरू झाल्यानंतर प्रदीप चौहान यांनी निशा चौहान यांना बेडरूममधून ओढत हॉलमध्ये आणले. त्यानंतर त्यांनी चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. त्यांच्या गळ्यावरही अनेक वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या निशा चौहान रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यानंतर प्रदीप यांनी स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
निशा चौहान यांचे इन्स्टाग्राम अकाउंट होते. त्यांनी आपल्या प्रोफाइलवर नाव ‘निशा राजपूत’ असे नमूद केले होते. त्यांच्या इन्स्टाग्रामवर 24.4 हजार फॉलोअर्स होते. त्यांनी आतापर्यंत 960 पोस्ट केल्या होत्या तर त्या केवळ 10 जणांना फॉलो करत होत्या. त्यांच्या बायोमध्ये “आप सबका प्यार”, “टारगेट 50 हजार”, “जय श्रीराम” आणि “जय भवानी” असे लिहिले होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून जमिनीच्या नोंदणीच्या वादाव्यतिरिक्त इतर कोणते कारण या घटनेमागे होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
Mumbai,Maharashtra
इन्स्टाग्राम स्टारला बेडरूममधून ओढत हॉलमध्ये आणले, 3 निष्पाप मुलांसमोर आईची गळा चिरून हत्या; घरच्याच व्यक्तीकडून क्रूरतेचा कळस
