लातूर: खासगी सावकाराचा फास एखाद्या व्यक्तीचे सर्वस्व कशाप्रकारे हिरावून घेतो, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी काही पीडितांशी आम्ही संवाद साधला आहे. लातूर (Latur) जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील एक छोटेसे गाव नणंद. या गावातील भोसले कुटुंब (farmer) मागील चार वर्षांपासून खाजगी सावकाराच्या सापळ्यात अडकले असून चार वर्षांत या कुटुंबातील आनंद अक्षरशः हिरावून गेला आहे. पुंडलिक भोसले हे आपल्या मित्रासाठी खासगी सावकाराकडे जामीनदार राहिले होते. त्यांच्या मित्राने दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ते वेळेत फेडता आले नसल्याने पुंडलिक भोसले यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. जामीनदार असल्यामुळे त्यांना सुमारे सव्वा कोटी रुपये किमतीची पाच एकर शेती सावकाराच्या नावावर करून द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे.
पीडित शेतकऱ्याने आपली जमीन सावकाराच्या नावावर केल्यानंतर, एवढे करूनही अजून 70 ते 80 लाख रुपयांचे व्याज बाकी असल्याचा दावा करत सावकाराचा तगादा आजही सुरू आहे. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. पाच एकर जमीन रजिस्टरद्वारे सावकाराच्या नावावर झाल्यामुळे कागदोपत्री व्यवहार कायदेशीर असल्याचे कारण पुढे करत प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. पुंडलिक यांना होणारा त्रास पाहून त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्यासाठी जामीनदारी स्वीकारली. मात्र, त्यांनाही खाजगी सावकाराच्या जाचाला सामोरे जावे लागले. 30 ते 40 लाख रुपये दिल्यानंतरही आणि साडेतीन एकर जमीन सावकाराच्या नावावर करून दिल्यानंतरही कर्ज संपले नाही. याउलट त्यांना मारहाण करण्यात आली, तब्बल तीन दिवस बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
खासगी सावकाराच्या शोषणाप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली; मात्र कारवाई अद्याप शून्य असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. याच गावातील सुमारे 20 ते 22 लोक खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून गाव सोडल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व अत्यंत धक्कादायक आहे. खासगी सावकाराच्या व्याजाच्या कर्जाचा फास कसा दिवसेंदिवस घट्ट होत जातो, याच्या या विदारक कहाण्या आहेत.
सावकाराचं चक्रव्याढ वाज, शेतकऱ्याला फास
गावातील शेतकऱ्यांसह अनेकांना एक लाख रुपये केवळ तीन महिन्यांसाठी पाच टक्के मासिक व्याजदराने कर्ज दिले जाते. त्यासाठी दोन जामीनदार घेतले जातात. ठरलेल्या मुदतीत मुद्दल आणि व्याज परत न केल्यास दररोज हजारो रुपयांचा दंड आकारला जातो. जामीनदारांनाही शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण केली जाते. त्यानंतर हे कर्ज फेडण्यासाठी सावकार दुसऱ्या सावकाराला मध्ये आणतो. पहिला सावकार आपले मुद्दल आणि व्याज वसूल करून मोकळा होतो. दुसरा सावकार ते कर्ज फेडून संबंधित व्यक्तीला दहा टक्के व्याजदराने नवीन कर्ज देतो आणि पुन्हा त्याच चक्रात अडकवतो. अशा पद्धतीने कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि शेवटी शेतकऱ्यांची शेतजमीन हडप केली जाते. दहशत, शिवीगाळ, मारहाण आणि दबावाच्या जोरावर जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या जातात. कागदोपत्री सर्व व्यवहार कायदेशीर दिसत असल्याने अन्याय झालेल्या अनेकांना न्याय मिळणे अत्यंत कठीण होते.
हेही वाचा
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग