Last Updated:
ज्या महिलेवर सर्वाधिक विश्वास टाकला, तिनेच घरात असा काही ‘मास्टरप्लॅन’ आखला की ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.
पुणे : पुण्यातील एका व्यक्तीने आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी घरात चार महिला केअरटेकर ठेवल्या. मात्र, ज्या महिलेवर सर्वाधिक विश्वास टाकला, तिनेच घरात असा काही ‘मास्टरप्लॅन’ आखला की ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. या चार केअरटेकरपैकी अनिता नावाची एक केअरटेकर वृद्ध महिलेचा काळजी घेण्यासाठी घरातच राहायची. याचाच फायदा घेत तिने असं काही कांड केलं की सगळेच हादरले. सुरुवातीला वृद्ध महिलेच्या हातातील एक सोन्याची बांगडी गायब झाली. यावेळी स्वतः अनितानेच महिलेचा मुलगा असलेल्या फिर्यादी अजय कनोत्रा यांना याबद्दल माहिती दिली. मात्र, शेवटी हे सगळं तिचंच कांड असल्याचं समोर आलं.
विमानतळ पोलिसांनी अत्यंत चातुर्याने या गुन्ह्याचा तपास करत चार महिलांमधून मुख्य आरोपी महिलेला शोधून काढले आहे. अनिता रामचंद्र सुतार (वय ४५, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या महिला नोकराचे नाव आहे. याप्रकरणी अजय राजकुमार कनोत्रा (वय ५९, रा. कोनार्क कॅम्पस, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अजय कनोत्रा हे आपल्या वृद्ध आईसोबत राहतात. आईच्या देखभालीसाठी त्यांनी अनिता सुतारसह चार महिला ठेवल्या होत्या. २१ मे रोजी अनितानेच अजय यांना सांगितले की, “आईच्या हातातील चार बांगड्यांपैकी एक बांगडी दिसत नाही.” अजय यांनी घरात शोध घेतला पण ती सापडली नाही. सावधगिरी म्हणून त्यांनी आईच्या हातातील उर्वरित तीन बांगड्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले आणि ते कामानिमित्त गुवाहाटीला गेले.
७ जून रोजी ते परत आले. त्यानंतर १० जून रोजी अनिताने गावी देवीची पूजा असल्याचे सांगून सुट्टी घेतली. १५ जून रोजी अजय आईजवळ बसले असताना त्यांचे लक्ष आईच्या हातातील बांगड्यांकडे गेले. त्यांना त्या बांगड्या काहीशा वेगळ्या भासल्या. त्यांनी मोबाईलमधील जुना फोटो काढून पाहिला आणि त्यांना मोठा धक्का बसला. आईच्या हातातील खऱ्या बांगड्या गायब होत्या आणि तिथे हुबेहूब दिसणाऱ्या नकली बांगड्या घालण्यात आल्या होत्या.
जवळपास ५ लाख ९५ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याने त्यांनी विमानतळ पोलिसांत धाव घेतली. चार महिलांपैकी नक्की चोरी कोणी केली? हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी सर्व महिलांची कसून चौकशी सुरू केली असता, अनिता सुतारच्या उत्तरांवरून पोलिसांचा संशय बळावला.
तिला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिनेच पहिली बांगडी चोरली होती आणि त्यानंतर तशाच बनावट बांगड्या बनवून आणून आईच्या हातात अडकवल्या होत्या. पोलिसांनी तिच्याकडून चोरीच्या सोन्याच्या बांगड्या, घरातील चांदीचे ग्लास, निरंजन असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Pune,Maharashtra
पुण्यात धक्कादायक प्रकार! वृद्ध आईसाठी घरात ठेवल्या 4 केअरटेकर, शेवटी घडलं असं कांड की पोलीसही चक्रावले
