Abhishek Sharma Reaction Ishan Kishan Run Out : आयर्लंडविरुद्धच्या पराभवाचे दुःख विसरून भारतीय संघाने 1 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात केली. मात्र, मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. डरहममधील चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 189 धावा केल्या. पहिला डाव संपल्यानंतर लगेचच मैदानावर पाऊस सुरू झाला आणि तो सुमारे एक तास सुरू होता. मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन हा मोठ्या गैरसमजामुळे धावबाद झाला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान याच प्रकारे रनआउट झाला आहे. याआधी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही तो अशाच पद्धतीने बाद झाला होता.
नेमकं काय घडलं?
भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात ईशान किशनने चेंडू मिडविकेटच्या दिशेने हलकासा ढकलला आणि एक धाव घेण्यासाठी धावायला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या टोकाला असलेल्या अभिषेक शर्माने हॅरी ब्रूकला चपळाईने चेंडू अडवल्याचे पाहताच धाव घेण्यास नकार दिला. तोपर्यंत ईशान खूप पुढे निघून गेला होता. तिसऱ्या पंचांकडून रनआउटची पडताळणी सुरू असताना मैदानावर अभिषेक शर्माचा संताप स्पष्ट दिसत होता. स्टंप माईकमध्ये दोघांमधील संभाषणही रेकॉर्ड झाले.
स्टंप माईकमध्ये काय ऐकू आलं?
ईशान बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा संतापलेल्या आवाजात म्हणाला, “तू पोहोचलास की नाही? काय करतोयस रे यार, ईशान?” यावर ईशानने उत्तर दिले, “मला माहिती नाही.” त्यावर अभिषेक आणखी चिडून म्हणाला, “काय करतोयस रे यार, ईशान!” यावर ईशानने स्पष्ट केले, “ती माझी कॉल होती.” यानंतर अभिषेक म्हणाला, “किमान चेंडू कुठे जातोय ते तरी बघायला हवं होतं.” ईशानने क्रीजमध्ये परतण्यासाठी डाइव्हही मारली, पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्याला धावबाद घोषित करण्यात आले. संजू सॅमसन आणि ईशान किशन या दोघांचेही विकेट भारताने अवघ्या दोन षटकांत गमावले.
अभिषेक शर्माचा तुफानी पलटवार
सुरुवातीच्या गोंधळानंतर अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याने अवघ्या 24 चेंडूंमध्ये 59 धावांची स्फोटक खेळी साकारली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली. या दमदार खेळी दरम्यान अभिषेक शर्माने एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला. अभिषेकने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारतीय डावाला स्थिरता दिली आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला