South Actress Kayadu Lohar: साऊथ सिनेमांची (South Films) अभिनेत्री कयादु लोहार (Kayadu Lohar) सध्या तिचा आगामी तमिळ सिनेमा ‘इदयम मुरली’ (Idhayam Murali)च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात तिच्यासोबत सह-कलाकार अथर्व मुरली (Atharvaa Murali) आणि प्रीती मुकुंदन (Preity Mukhundhan) देखील झळकणार आहेत. ‘गलाट्टा तमिळ’ (Galatta Tamil) सोबतच्या एका अलीकडील पॉडकास्टमध्ये तिनं खुलासा केलाय की, इयत्ता दहावीत असताना मुलांच्या एका गटानं तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला. अभिनेत्रीनं सांगितलं की, सुरुवातीला ती गप्प राहिली असली तरी, नंतर तिनं त्याविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रॅगन’ (Dragon) सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीनं खऱ्या आयुष्यातही अशीच धडाकेबाज कृती केली होती.
कयादु लोहारने विनयभंगाच्या ‘त्या’ घटनेची आठवण सांगितली
कयादु लोहार म्हणाली की, “मी जेव्हा दहावीत होते, तेव्हा घराच्या जवळच ट्युशनला जायचे. वाटेत काही मुलं मला त्रास द्यायची. पहिल्या दिवशी मला वाटलं की, “ठीक आहे, जाऊ दे…” दुसऱ्या दिवशीही मी तसंच केलं. पण तिसऱ्या दिवशी मात्र मला ते सहन झालं नाही…”
अभिनेत्रीनं आठवण सांगताना म्हटलं की, “मी खूप अस्वस्थ आणि संतापलेली होते, मी एक दगड उचलला आणि थेट त्याच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे त्याचं डोकं फुटलं. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. मी तिथून निघून गेले. पुढे काय झालं मला माहीत नाही, पण… ती घटना खूप हिंसक होती. कोणाच्या डोक्यात दगड घालावा असं मला वाटत नाही, पण त्या क्षणी मला तसंच वाटलं आणि मी तसंच केलं. कदाचित मी दिसायला भोळी किंवा असमर्थ वाटत असेल, मी जास्त बोलत नाही आणि शांत राहणं पसंत करते. पण जेव्हा कोणी काही चुकीचं करतं, तेव्हा गप्प राहून ते सहन करत राहावं, यावर माझा विश्वास नाही. तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे…”
कयादु लोहार कोण आहे?
कयादु लोहारनं तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलंय. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी ती एक मॉडेल होती. तिनं 2021 मध्ये ‘मुगिलपेटे’ (Mugilpete) या कन्नड सिनेमाद्वारे पदार्पण केलं. त्यानंतरच्या वर्षी, तिनं अनुक्रमे ‘पाथोनपाथम नूट्टांडू’ (Pathonpatham Noottandu) आणि ‘अल्लुरी’ (Alluri) या सिनेमांतून मल्याळम आणि तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 2023 मध्ये तिनं ‘आय प्रेम येऊ’ (Aai Prem Yeu) या मराठी सिनेमात काम केलंय. 2025 मधील ‘ड्रॅगन’ (Dragon) या तमिळ सिनेमामुळे तिला मोठी ओळख मिळाली. या सिनेमाद्वारे तिनं तमिळ भाषेतही पदार्पण केलंय.
कायादू अलीकडेच ‘फंकी’ (Funky) या तेलगू आणि ‘पल्लीचट्टाम्बी’ (Pallichattambi) या मल्याळम सिनेमांमध्ये दिसली होती. तिचा ‘हृदயம் मुरली’ (Hridayam Murali) हा तमिळ चित्रपट 10 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये तमिळमधील ‘इम्मॉर्टल’ (Immortal) आणि ‘मंजनाथी’ (Manjanathi); मल्याळममधील ‘आय ॲम गेम’ (I Am Game) आणि ‘थाराम’ (Tharam); तसेच तेलगूतील ‘द पॅराडाईज’ (The Paradise) यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा