तिथे पूर्व पतीच्या संपत्तीवरून वाद, इथे करिश्मा कपूरने भाड्यानं दिलं घर; महिन्याला मिळतेय तब्बल इतकी रक्कम – Marathi News | Karisma kapoor rented mumbai home for this much rupees with three car parking spaces


अभिनेत्री करिश्मा कपूरचा दिवंगत पूर्व पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू आहे. या वादादरम्यान आता करिश्माने तिचं मुंबईतील घर भाड्याने दिलं आहे. स्क्वायर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, करिश्माने मुंबईतील वांद्रे पश्चिम इथलं तिचं घर तब्बल 5.51 लाख रुपये प्रति महिना भाडेतत्त्वावर दिलं आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी नोव्हेंबर 2025 मध्ये झाली. वांद्रे पश्चिम हा मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या भागांपैकी एक आहे. त्यामुळे इथल्या घरांचं भाडंही गगनाला भिडलेलं आहे. मुंबई शहरात सहज प्रवास करण्यासाठी प्रमुख रस्ते, लोकल ट्रेन स्थानकं आणि आगामी मेट्रो मार्गांशी याची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), माहीम आणि सांताक्रूझ यांसारख्या प्रमुख ठिकाणांजवळ हे स्थान असल्याने त्याचं आकर्षण अधिक वाढतं.

वांद्रे पश्चिम हे इथल्या उच्च दर्जाची घरं, गजबजलेल्या मुख्य रस्त्यांवरील बाजारपेठा, लोकप्रिय रेस्टॉरंट्स, कॅफे, बँडस्टँड, कार्टर रोडवरील फुटपाथ यांसाठी ओळखलं जातं. या वैशिष्ट्यांमुळे व्यावसायिकांसाठी, कुटुंबांसाठी आणि उद्योगांसाठी हे एक पसंतीचं ठिकाण बनलं आहे. ‘स्क्वेअर यार्ड्स’ने मिळवलेल्या आयजीआर मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांनुसार, हिल रोडवरील ग्रँड बे कॉन्डोमिनियममधील या निवासी युनिटचं कार्पेट क्षेत्रफळ 204.38 चौरस मीटर (~2,200 चौरस फूट) आहे. या व्यवहारात तीन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश आहे. यासाठी 17,100 रुपये मुद्रांक शुल्क आणि 1000 रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आलं आहे. या व्यवहारात 20 लाख रुपयांच्या डिपॉझिटचाही समावेश आहे.

करिश्मा कपूरच्या या घराचा भाडेकरार नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाला आहे. मासिक भाडं 5.51 लाख रुपये निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे भाडेकराराच्या एकूण कालावधीत करिश्माला तब्बल 66.12 लाख रुपये भाडं मिळणार आहे. करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं वयाच्या 53 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. करिश्मा आणि संजय यांना विभक्त होऊन बरीच वर्षे झाली होती. त्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं. तर दुसरीकडे करिश्माने एकल मातृत्वाचा स्वीकार करत दोन्ही मुलांचं संगोपन केलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर संजय त्याच्या मुलांच्या संगोपनासाठी करिश्माला दर महिन्याला मोठी रक्कम देत होता. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा ताबा करिश्माला मिळाला. तर संजयला वेळोवेळी मुलांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा संजयने खार इथलं त्याच्या वडिलांचं घर करिश्माच्या नावे केलं होतं, असंही म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर संजयने 14 कोटी रुपयांचा बाँडसुद्धा त्याच्या मुलांच्या नावावर खरेदी केलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *