Health: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात तुमच्या हृदयाची काळजी घेणं तर अत्यावश्यक आहे, कारण वाढते प्रदुषण, टेन्शन, मानसिक समस्या, अयोग्य आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे हृदयाचे अनेक आजार झालेले पाहायला मिळत आहेत. उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा हृदयविकारास कारणीभूत असा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेकदा दीर्घकाळसाठी रक्तदाब नियंत्रणात नसल्याने हृदयावर परिणाम होऊ लागतो. या स्थितीला हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज असे म्हटले जाते. विशेष म्हणजे, सुरुवातीला याची कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळीच तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई येथील कार्डियाक सर्जन, डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या…
हृदयातील बदल ओळखण्यासाठी ‘ही’ तपासणी उपयुक्त…(Heart Hypertensive Heart Disease)
तज्ज्ञ सांगतात, हृदयातील बदल ओळखण्यासाठी 2 डी इको किंवा इकोकार्डिओग्राफी ही तपासणी उपयुक्त ठरते. या तपासणीत ध्वनीलहरींच्या मदतीने हृदयाची रचना आणि हृदयाचे कार्य तपासले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात काही महत्त्वाचे बदल दिसून येतात, ज्यांना “अर्ली इको मार्कर्स” म्हटले जाते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल्युअर होण्यापूर्वीच धोका ओळखता येऊ शकतो. यामध्ये सर्वात सामान्य बदल म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी (LVH). यात हृदयाच्या मुख्य पंपिंग चेंबरच्या भिंती जाड होऊ लागतात. सतत वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे हृदयाचे स्नायू मोठा होतात.
हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होण्याचा धोका..
सुरुवातीला हृदय व्यवस्थित काम करत असले तरी उपचार न घेतल्यास पुढे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होण्याचा धोका असतो. तसेच डायस्टोलिक डिसफंक्शन ही समस्या देखील दिसू शकते. ही हृदयाशी संबंधित एक स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाचे स्नायू आकुंचन पावल्यानंतर व्यवस्थित शिथिल (relax) होत नाहीत त्यामुळे हृदयातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया बिघडते. अशा रुग्णांना थकवा, धाप लागणे किंवा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे जाणवू शकतात. याशिवाय लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट म्हणजे हृदयाच्या डाव्या बाजूला असलेल्या कप्प्याचे (डावी कर्णिका/एट्रियम) सामान्य आकारापेक्षा मोठे होते, ही स्थितीही हळूहळू आढळून येऊ शकते. दीर्घकाळ वाढलेल्या दाबामुळे हा बदल होतो. त्यामुळे एट्रियल फायब्रिलेशनसारख्या अनियमित हृदय ठोक्यांचा धोका वाढतो आणि पुढे स्ट्रोकची शक्यता वाढते.
सुरूवातीची ही लक्षणं ओळखा…
हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे, हृदयाच्या झडपांमध्ये बदल होणे तसेच हृदयातील दाब वाढणे असे सुरुवातीचे बदलही इको तपासणीत दिसून येऊ शकतात. छातीत दुखणे, धाप लागणे, पायांना सूज येणे, चक्कर येणे, सतत थकवा जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा चालताना आणि जिने चढताना त्रास होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र अनेक रुग्णांमध्ये वर्षानुवर्षे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
हृदय निरोगी कसं ठेवाल?
दीर्घकाळ उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपानाची सवय किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी नियमित हृदय तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे, मीठाचे प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
ही बातमी वाचा:
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
आणखी वाचा