England vs India 1st T20i Weather Report : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा थरार आज बुधवार 1 जुलै रोजी डरहम येथील चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाइड ग्राउंडवर सुरू होणार आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक बातमी समोर येत आहे. या पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट असून, डरहममध्ये तब्बल 80 टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना एकही चेंडू न फेकता रद्द होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भारतीय संघाला पुनरागमन करण्याची संधी
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 2-0 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाच्या कडू आठवणी विसरून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेत विजयी पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु, खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वीच निसर्गाचा खेळ सुरू झाला आहे.
डरहममधील हवामानाचा अंदाज (Weather Update)
अक्युवेदरच्या अहवालानुसार, बुधवारी डरहममध्ये हवामान कमालीचे खराब राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश जवळपास 85% ढगांनी वेढलेले असेल. दिवसा पावसाची शक्यता 80% आहे, जी रात्री वाढून 84% पर्यंत पोहोचेल. सामन्यादरम्यान साधारण दीड तास पावसासोबतच 16% वादळ येण्याचीही शक्यता आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे बुधवारी कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हे हवामान आयर्लंडपेक्षा थोडे अधिक थंड असेल. तसेच, हवेत 60% पर्यंत आर्द्रता (ह्युमिडिटी) असल्याने खेळाडूंना मैदानावरील हवामान थोडे चिकट जाणवू शकते.
सामन्याचे षटक कमी होण्याची शक्यता
पावसामुळे नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. तसेच, सामन्यादरम्यान पाऊस आल्यास खेळ थांबवावा लागेल. हवामानाची ही एकूण परिस्थिती पाहता, सामन्यातील षटकांची संख्या कमी होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस जास्त वेळ न पडल्यास डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सामन्याचा निकाल लागू शकतो.
टी-20 हेड-टू-हेड रेकॉर्ड: भारताचे पारडे जड
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 रेकॉर्ड पाहिला तर भारतीय संघाचे पारडे नक्कीच जड आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 18 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला केवळ १२ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. यापूर्वी हे दोन्ही संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत (Semifinal) आमने-सामने आले होते. त्या हाय-स्कोअरिंग सामन्यात इंग्लंडने भारताला तगडी फाईट दिली होती, मात्र भारतीय संघाने अवघ्या 7 धावांनी थरारक विजय मिळवला होता.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला