Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून ‘वेलकम’; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ


मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार आणि वरळी मतदारसंघातील नेते सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) जाण्याचा निर्णय घेतला. कारण, आज विधानपरिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आमच्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आले, त्यांना शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर मुंबईत (mumbai) त्यांच्या स्वागतासाठी सचिन अहिर आले आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी टीका केली. एकनाथ शिंदे जे करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे काही अडचण नाही, मी काही खुलासा करणार नाही पण जे काही केले ते फुलप्रूफ आहे, असे म्हणत कायदेशीर पश्न उद्भवणार नसल्याचेच एकनाथ शिंदेंनी सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या पक्षप्रवेशानंतर म्हटले. 

ग्रासरुटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांच्याकडे पहिले जाते, त्यांनी आज महायुतीतून उपसभापतीपदाचा फॉर्म भरला आहे, उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. फक्त मुंबईच नाही तर उपसभापती म्हणून ते महाराष्ट्राचे काम करतील, ते असल्याने शिवसेनेची ताकद मुंबई कामगार क्षेत्रात वाढेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्याची माफक अपेक्षा असते, आज विधानपरिषद आमदार गोकुळ गीतेदेखील सहयोगी पक्ष म्हणून सोबत आहेत, आम्ही तोडायला नाही जोडला आलो आहोत. पॉझिटीव्ह आणि प्रॅक्टिकल रहाणे ही आमची भूमिका आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केले, एक टीम म्हणून काम करण्यात सचिन अहिर यांचा हातखंडा आहे, मी त्यांचे मनापासून स्वागत करतो, शुभेच्छा देतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. 

30 तारखेलाचा माझा शपथविधी हा योगायोग

आम्ही 22 जून 2022 ला उठाव केला, आज 30 तारीख आहे तेव्हा देखील याच तारखेला माझा शपथविधी झाला होता, हा योगायोग आहे, मी देवेंद्रजी एकत्र होतो दोघांनी टीम म्हणून काम केले. महाविकास आघाडीच्यावेळी विकासकामात थोडा बॅकलॉग होता, पण महायुतीच्या काळात महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात धावू लागला, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी जुन्या आठवणी सांगितल्या. 

सागर बंगल्यावर पोलीस पाठवले 

मी एक सांगू का, देवेंद्रजींनी ते मुख्यमंत्री असताना 2019 ला 50 फोन केले, पण एकही उचलला नाही. एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन, अशी भाषा होती त्यांची. देवेंद्र फडणवीसांवर खोटे गुन्हे दाखल करणे, सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, हे करणारे, त्यांना अचानक पुतना मावशीचं प्रेम आलं आहे. देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना सगळं कळतं. मी यावर आणखी बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधानपदाबाबतच्या वक्तव्यावरुन एकनाथ शिंदेंनी पलटवार केला. 

आपल्यासोबत असेपर्यंतच चांगले – अहिर

आपल्यासोबत असेपर्यंत चांगले आणि पक्ष सोडल्यावर नालायक ठरवण्याचा प्रयत्न हा दुर्देवी आहे. जेव्हा इतर पक्षातून आपल्याकडे लोक येतात तेव्हा ते स्वार्थाचा विचार करत नाहीत. हेच नेते जातात तेव्हा मात्र त्यांना स्वार्थी ठरवले जाते. काहींना वाटतं की, आपणच सर्वकाही आहोत. पण मतदारसंघातील लोकांना माझं योगदान माहिती आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे फुटीर आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सचिन अहिर यांनी राजकीय आरोपांना थेट उत्तर देणे टाळले असले तरी त्यांनी मोजक्या शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पलटवार केला. 

एकनाथ शिंदेंचे आभार

मी एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो. कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि त्यावेळी तो हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातून विश्व घडवण्याचं काम आपण करत असतो. एकनाथ शिंदेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपसभापती पदावर बहुमान देऊन, तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं, असे म्हणत सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले.

हेही वाचा

Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर…एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *