1 लिटर शुद्ध पेट्रोलची किंमत किती असेल? ते E20 पेट्रोलपेक्षा किती महाग? – Marathi News | Pure petrol price vs e20 petrol cost difference benefits explained


संपूर्ण देशात सध्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोलबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अनेक वाहनचालकांनी दावा केला आहे की, E20 पेट्रोलमुळे कार आणि बाईकचे मायलेज कमी होते. त्याचबरोबर वाहनांच्या काही पार्ट्सवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र केंद्र सरकारने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. एका मुलाखतीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, ‘इथेनॉल-मिश्रित पेट्रोल पूर्णपणे सुरक्षित असून त्याचा कार किंवा दुचाकीच्या इंजिनवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही. E20 इंधनाचा मुख्य उद्देश देशातील कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे.’

शुद्ध पेट्रोल किती रुपये लागतील?

आपल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केले की, ‘ज्यांना इथेनॉल-मिश्रित इंधन वापरायचे नसेल, ते इथेनॉलविरहित म्हणजेच शुद्ध पेट्रोल खरेदी करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना अधिक किंमत मोजावी लागेल.’ त्यामुळे प्रश्न असा आहे की, शुद्ध पेट्रोलची किंमत किती आहे आणि ते E20 पेट्रोलपेक्षा किती महाग आहे? याचेच उत्तर आज आपण जाणून घेऊयात.

शुद्ध पेट्रोलची किंमत किती?

राजधानी दिल्लीमध्ये E20 पेट्रोलची किंमत प्रतिलिटर सुमारे 102 रुपये आहे. तर शुद्ध पेट्रोल खरेदी करायचे असल्यास त्यासाठी प्रतिलिटर 167 ते 170 रुपये मोजावे लागतील. हे भारतातील पहिले 100 ऑक्टेनचे अल्ट्रा प्रीमियम पेट्रोल असून, उच्च कार्यक्षमतेच्या (हाय-परफॉर्मन्स) वाहनांसाठी विशेष तयार करण्यात आले आहे. XP100 नावाचे हे पेट्रोल इंडियन ऑइलच्या अनेक पेट्रोल पंपांवर उपलब्ध आहे.

शुद्ध पेट्रोलचे फायदे काय?

शुद्ध पेट्रोलमुळे वाहनाला अधिक वेगाने पिकअप आणि जास्त पॉवर मिळते. तसेच वाहनाचे मायलेज सुधारण्यास मदत होते. सामान्य पेट्रोलच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी असल्याने पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो. तसेच यात प्रगत डिटर्जंट अॅडिटिव्ह्ज असल्यामुळे इंजिनमध्ये कार्बन साचत नाही. त्यामुळे इंजिन स्वच्छ राहते आणि अधिक सुरळीतपणे कार्य करते.

महत्त्वाची बाब म्हणजे, 100 ऑक्टेनचे शुद्ध पेट्रोल सामान्य 91 ऑक्टेनवर चालणाऱ्या वाहनात भरल्यास कोणतेही नुकसान होत नाही. उलट, वाहनाचे मायलेज आणि इंजिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच 91 ऑक्टेन पेट्रोल आणि शुद्ध पेट्रोल एकमेकांत मिसळले तरी इंजिन किंवा वाहनाला कोणतीही हानी होत नाही. सामान्य 91 ऑक्टेन पेट्रोलच्या तुलनेत वाहनाची कामगिरी अधिक स्मूथ आणि किंचित अधिक चांगली जाणवते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *