Last Updated:
Mouni Roy lashes out at paparazzi: पॅप्ससमोर नेहमी हसून पोज देणारी मौनी नुकतीच पॅप्सवर प्रचंड भडकल्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई: इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना प्रसिद्धी हवी असते आणि कॅमेरामनना त्यांचे फोटो. पण अनेकदा ही कॅमेऱ्यांची नजर कलाकारांच्या खाजगी आयुष्यात इतकी डोकावते की त्यांचा संयम सुटतो. असाच एक हाय-व्होल्टेज ड्रामा टीव्ही विश्वाची ‘नागीण’ म्हणजेच अभिनेत्री मौनी रॉयसोबत घडला आहे. पॅप्ससमोर नेहमी हसून पोज देणारी मौनी नुकतीच पॅप्सवर प्रचंड भडकल्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेनंतर मौनीने इन्स्टाग्रामवर थेट पॅप्सविरोधात एक जळजळीत पोस्ट लिहिली आणि काही वेळातच ती डिलीटही केली, ज्यामुळे सध्या उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
पापाराझीवर भडकली मौनी रॉय
काल रात्री मौनी रॉयला एका ठिकाणी स्पॉट करण्यात आले होते. तिथे उपस्थित असलेल्या कॅमेरामननी तिला वेढले आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यामुळे अस्वस्थ झालेल्या मौनीचा पारा चांगलाच चढला. तिने थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली नाराजी व्यक्त करत लिहिले, “कृपया यापुढे माझे फोटो काढणे पूर्णपणे बंद करा. मी तुम्हाला कधीही स्वतःहून फोन करून बोलावलेले नाही आणि यापुढेही बोलावणार नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर नक्कीच आहे, पण माझी विनंती आहे की माझ्या फोटोंसाठी तुम्ही पुन्हा कधीही येऊ नका. मी तुमची अत्यंत आभारी राहीन.”
डिलीट केली इन्स्टाग्राम स्टोरी
मौनी इथेच थांबली नाही, तर तिने चाहत्यांना स्पष्टीकरणही दिले. ती पुढे म्हणाली, “यापुढील काळात जर मी तुम्हाला कुठेही कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसले, तर असा गैरसमज करून घेऊ नका की मी त्या कॅमेरामनना बोलावले आहे. मला तुमच्या कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटमध्ये अजिबात राहायचे नाहीये. हे सगळं आता थांबवा, हीच विनंती!”

या अत्यंत आक्रमक पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. मात्र, मौनीने काही मिनिटांतच ही स्टोरी आपल्या अकाउंटवरून डिलीट केली. मौनीने अचानक घेतलेल्या या यु-टर्नमुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे की, नक्की असे काय घडले ज्यामुळे तिला ही पोस्ट डिलीट करावी लागली? जरी तिने पोस्ट डिलीट केली असली, तरी तिचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले होते.
नात्यांच्या सीमांवरून सोशल मीडियावर वाद पेटला
मौनी रॉयच्या या पवित्र्यानंतर डिजिटल जगतात सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मौनीच्या चाहत्यांनी तिची बाजू लावून धरली असून, “सेलिब्रिटींनाही स्वतःचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि मोकळा श्वास घेण्याचा पूर्ण अधिकार आहे,” अशा कमेंट्स केल्या आहेत. तर दुसरीकडे, काही नेटकऱ्यांनी “पब्लिक फिगर असल्यावर या गोष्टी सहन कराव्याच लागतात,” असा सूर लावला आहे. या संपूर्ण वादानंतर मौनीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण तिच्या या रुद्रावतारामुळे सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
Mumbai,Maharashtra
‘प्लीज आता थांबा’, पॅपाराझींवर भडकली मौनी रॉय! मध्यरात्रीच्या कृत्याने राग अनावर, पोस्ट टाकून केली डिलीट
