मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता सोनू सूदच्या राहत्या घरी शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास साप आढळल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना मिळाली. कॉल मिळताच त्यांनी वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड तसेच मुंबई रेंज कंट्रोल ऑफिस, ठाणे यांना याबाबत माहिती दिली आणि तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पाहणी केली असता, पावसामुळे पडलेल्या नारळाच्या पानांखाली सुमारे सहा फूट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी साप लपून बसलेला आढळला. सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक सापाला सुरक्षितरीत्या पकडले.
यावेळी उपस्थित नागरिकांना धामण सापाविषयी माहिती देत हा साप बिनविषारी असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.
दरम्यान, पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बाहेर येण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरात साप आढळल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी वन विभागाच्या 1926 या हेल्पलाइनवर किंवा जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधून सापाचे सुरक्षित रेस्क्यू करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.




