मुंबई : राज्यात एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादीचे (NCP) महायुतीत येणार असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते असलेल्या सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना काहीच माहिती नसल्याची बाब आता समोर आली आहे. त्यावरुन, माजी आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी राष्ट्रवादीत काहीही आलबेल नसल्याचं मान्य केलंय.
सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाचे दोन वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जयंत पाटलांसह मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी घेतलेली भेट ही पक्ष नेतृत्वाला माहित नसल्याचं समोर आलं. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच या वृत्ताला दुजोरा दिलाय. भरणे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलय. पक्ष नेतृत्वाला न विचारता नेमकं कोणती चर्चा करण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पक्षातील काही नेते जाणीवपूर्वक सुनेत्रावहिनी आणि पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मात्र, त्यांनी कुठल्याही नेत्याचं थेट नाव घेतलं नाही.
पक्षातील याच लोकांकडून सच्चिदानंद सिंह यांना ताकद दिली गेली आहे. सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवारांना त्रास देणारे नेते कोण आहेत याचा शोध पक्षाचे कार्यकर्ते घेतील. पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते अशा नेत्यांना तळागाळात गाडतील, असेही त्यांनी म्हटलं. आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्यांशी भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आमच्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करावी, अशी अपेक्षा देखील मिटकरी यांनी व्यक्त केलीय.
दत्तात्रय भरणे फोन सुद्धा उचलत नाहीत
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आपला फोन घेत नसून भाजप आमदारांसाठी तत्परता दाखवत असल्याचंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अनेकवेळा फोन केल्यानंतरही त्यांनी उत्तर दिलंन नाही. भरणे यांना इतर पक्षाच्या नेत्यांचे फोन उचलायला वेळ आहे. मात्र, ते आपले फोन उचलत नसल्याचा आरोप करीत कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनास्था दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अजितदादा असताना असं होत नव्हतं. दादा नसल्यानेच असे प्रकार होत आहेत. भरणे यांचे हे वागणं वेदनादायी आहे. मात्र, भरणेंची कोणतीही तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार नसल्याचेही अमोल मिटकरींनी स्पष्ट केले.
हेही वाचा
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?