शिंदेंच्या बड्या मंत्र्याने मुलासाठी लावली ताकद, विधानपरिषदेचं तिकीट मिळावं म्हणून थेट…आता महायुतीपुढे या जागेसाठी मोठा पेच! – Marathi News | Gulabrao patil demands jalgaon seat for son prataprao patil in vidhan parishad election


Jalgaon Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिकेचे सदस्य मतदान करत असतात. दरम्यान, या निवडणुकीतही महायुतीचीच सरशी होण्याची दाट शक्यता आहे. कारण काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीत महायुतीचेच सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. या निवडणुकीत एकूण 17 जागांसाठी चुरस असेल. दरम्यान, आता महायुतीमध्ये एकीकडे वाटाघाटी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मात्र तिकीट मिळावे यासाठी इच्छुकांची धावपळ पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता जळगाव विधानपरिषदेची जागा चर्चेत आली आहे. कारण या जागेवर भाजपाने दावा केलेला असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बड्या नेत्यानेच आपल्या मुलासाठी ताकद लावली आहे. मुलाला तिकीट मिळावे म्हणून या मंत्र्याकडून प्रयत्न केले जात आहेत.

वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली तर जागा मिळेल

मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव विधान परिषदेसाठी त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या मुलाला तिकीट मिळावे यासाठी ते आपले वजन वापरत आहेत. मी माझ्या मुलासाठी जळगावची उमेदवारी मागितल आहे, अशी माहिती खुद्द त्यांनीच दिली आहे. वरच्या पातळीवर चर्चा होऊन ही जागा शिवसेनेला सुटेल असा विश्वास शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे जळगाव विधानपरिषदेच्या जागेवर महायुतीतील भाजपनेदेखील दावा केला आहे. त्यामुळे आता या जागेसाठी भाजपा आणि शिंदे गटात चढाओढ होण्याची शक्यता आहे..

…म्हणून आम्हाला ही जागा मिळावी

या जागेसाठी वरिष्ठ नेतेमंडळी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. वरच्या पातळीवर जागांमध्ये फेरबदल झाले तर जळगावची विधानपरिषदेची जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी मागणीही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. आतापर्यंत भाजपाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेले आहे. यापूर्वी दोन वेळा शिवसेनेने ही जागा लढवली असून जिंकलीसुद्धा आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी असे गुलाबराव पाटील यांचे मत आहे. दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या या भूमिकेनंतर आता महायुतीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *