Last Updated:
Pune News: लग्नानंतर काही महिन्यांतच पत्नीला सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर तिच्या वागणुकीत बदल झाल्याचा आरोप पतीकडून करण्यात आला आहे.
पुणे: सरकारी नोकरी लागणे हे अनेकांसाठी मोठ्या आनंदाची आणि प्रगतीची बाब मानली जाते. मात्र पुण्यात एका प्रकरणात हीच नोकरी एका दाम्पत्याच्या संसारात दुरावा निर्माण करणारी ठरली. लग्नानंतर काही महिन्यांतच पत्नीला सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर तिच्या वागणुकीत बदल झाल्याचा आरोप पतीकडून करण्यात आला आहे. संवाद कमी झाला आणि अपेक्षा वाढल्याने दोघांमध्ये हळूहळू अंतर निर्माण झाले. सतत वाढत गेलेला तणाव आणि मतभेद यानंतर अखेर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही वर्षांपासून घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. घटस्फोट होण्यामागे अनेक कारणे असली तरी वाढत गेलेले गैरसमज आणि कमी झालेला संवाद ही प्रमुख कारणे अनेक प्रकरणांमध्ये समोर येत आहेत. अशाच स्वरूपाची कारणे या प्रकरणातही स्पष्ट झाली आहेत. सरकारी नोकरी लागल्यानंतर अपेक्षांमध्ये झालेली वाढ आणि त्यातून निर्माण झालेला संवादाचा अभाव हे प्रमुख कारण ठरत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणातही सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीच्या अपेक्षांमध्ये वाढ झाल्याने दाम्पत्यातील संवाद पूर्णपणे तुटल्याचे समोर आले. परिणामी पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. मात्र सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने विभक्त होण्यास सहमती दर्शवल्याने हा दावा अखेर परस्पर संमतीने घटस्फोटात रूपांतरित झाला. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी निकाल दिला. पतीच्या वतीने अॅड. खंडेराव टाचले व अॅड. आकाश बिराजदार यांनी बाजू मांडली, तर पत्नीच्या वतीने अॅड. महात्मे यांनी काम पाहिले.
प्रसाद (वय 32) आणि माधवी (वय 30) (नावे बदललेली) हे दोघेही मूळचे विदर्भातील आहेत. प्रसाद हा पुण्यात खासगी नोकरी करत असून त्यांचा विवाह मे 2023 साली झाला होता. विवाहानंतर अवघ्या महिन्याभरातच पत्नीला सरकारी नोकरी मिळाली आणि ती विदर्भात कार्यरत झाली. त्यानंतर दोघांमधील संवाद हळूहळू कमी होत गेला.
पती आणि सासरकडील संपर्कही तुटत गेल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला. दोघे सुमारे दोन वर्षे चार महिने स्वतंत्रपणे राहत होते. अखेर वाढत गेलेल्या तणावामुळे पतीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने विभक्त होण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार लग्नातील सर्व स्त्रीधन पत्नीला देण्यात आले असून तिने पोटगीचे हक्कही सोडून दिले आहेत.
Pune,Maharashtra
Jun 14, 2026 11:58 AM IST
लग्न झालं अन् महिन्यातच मिळाली गुड न्यूज, पण सरकारी नोकरीच ठरली घटस्फोटाचं कारण, काय घडलं?
