Raigad z p scam: रायगड जिल्हा परिषदेतील ४ कोटी १२ लाखांच्या आर्थिक अपहार प्रकरणात आरोपी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सहआरोपींकडून मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याने पत्नीने गुन्हा दाखल केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात उघडकीस आलेल्या ४ कोटी १२ लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात आता खळबळजनक वळण आले आहे. या प्रकरणातील आरोपी कर्मचारी ज्योतिराम पांडुरंग वरुडे (वय ४८, रा. तळाशेत, इंदापूर, ता. माणगाव) यांनी १२ ऑक्टोबर २०२५ रोजी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
सदर आत्महत्येनंतर सापडलेल्या चिठ्ठीमध्ये सहआरोपी नाना एकनाथ कोरडे व महेश गोपीनाथ मांडवकर (दोघेही रा. अलिबाग ) यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास व दबाव आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याआधारे वरुडे यांच्या पत्नी अश्विनी ज्योतिराम वरुडे (वय ४७) यांनी २० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अलिबाग पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागपूर महापालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसीसाठी खंडणी? आमदार विकास ठाकरेंचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘प्रशासकाच्या काळात…’ फेब्रुवारी २०२५ मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी आर्थिक अपहाराची तक्रार दिली होती. त्यानंतर वरुडे, कोरडे आणि मांडवकर यांच्याविरोधात गु.र.नं. ३३/२०२५, भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्योतिराम वरुडे हे सहआरोपींना भेटण्यासाठी अलिबागमध्ये आले असता, त्यांनी विद्यानगर येथील मेव्हण्याच्या घरी विषारी औषध सेवन केले. त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याने पत्नी आणि मुलाने जिल्हा शासकीय रुग्णालय, अलिबाग येथे दाखल केले. मात्र २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६.२७ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, फिर्यादी अश्विनी वरुडे यांचा मोबाईल नंबर पोलिस DCR मध्ये नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमे, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित अधिकाऱ्यांपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, अशी चर्चाही सुरू आहे.
हा प्रकार केवळ आर्थिक घोटाळ्यापुरता मर्यादित न राहता, मानसिक त्रास, दबाव आणि आत्महत्या यांचे गंभीर परिणाम दाखवणारा ठरला आहे. आता या प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा