राजस्थानात मराठी अभ्यासकेंद्र उभारा म्हटल्याने राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा पुतळा जाळला, मराठी vs राजस्थानी वाद! | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Haribhau Bagde: राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राजस्थान विद्यापीठात ‘मराठी अभ्यासकेंद्र’ उभारण्याचे निर्देश दिल्यानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी आणि संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ राजस्थानात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा पुतळा आणि फोटो जाळण्यात आले आहेत.

हरिभाऊ बागडे (राज्यपाल-राजस्थान)
हरिभाऊ बागडे (राज्यपाल-राजस्थान)

संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रात हिंदी शिकवण्यावरून गेल्या आठ-दहा महिन्यांवरून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन उभे राहिले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून मात्र हिंदी भाषा शिकविण्याच्या धोरणाची पाठराखण करण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे त्याच भाजपचे जुने जाणते नेते, सध्याचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राजस्थानात मराठी अभ्यासकेंद्र उभारा असे केवळ म्हटल्याने त्यांचे पुतळे जाळले गेले आहेत. राजस्थानात मराठी शिकण्याचे कारण काय? असे विचारीत तेथील स्थानिकांनी हरिभाऊ बागडे यांचा पुतळा जाळला. त्यामुळे राजस्थानात मराठी विरुद्ध राजस्थानी असा नवा वाद उभा राहिला आहे.

नेमका काय आहे वाद?

राजस्थानचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळणारे हरिभाऊ बागडे हे पदसिद्ध अधिकारानुसार राजस्थान विद्यापीठाचे कुलपती आहेत. त्यांनी विद्यापीठाअंतर्गत मराठी भाषेचा अभ्यास आणि संशोधन व्हावे या उद्देशाने राजस्थानात ‘मराठी स्टडी सेंटर’ उभारण्यासंदर्भात निर्देश दिले होते.

मात्र, राज्यपालांच्या या निर्देशांनंतर राजस्थानमधील काही स्थानिक नागरिक आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. राजस्थानात मराठी भाषेचे शिक्षण कशासाठी हवे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

फोटो आणि पुतळा जाळून निषेध

या निर्णयामुळे संतापलेल्या आंदोलकांनी हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचे फोटो आणि पुतळे जाळले. राज्यस्थानातील स्थानिक संस्कृती आणि भाषेला डावलून इतर भाषेचे केंद्र कशासाठी उभे केले जात आहे, असा सूर आंदोलकांकडून लावला जात आहे. या घटनेमुळे राजस्थानमध्ये अचानक मराठी भाषेवरून वाद पेटला असून वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेबरोबर हिंदी भाषेच्या समर्थनासाठी आग्रही राहणाऱ्या भाजपच्याच नेत्याला राजस्थानमध्ये मराठी भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करताना स्थानिक विरोधाचा सामना करावा लागत असल्याने या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

राजस्थानात मराठी अभ्यासकेंद्र उभारा म्हटल्याने राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा पुतळा जाळला, मराठी vs राजस्थानी वाद!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *