महामृत्यूंजयचा जप सुरू असतानाच रक्ताचे सडे… एकामागोमाग चौघांचा खून; हत्याकांडाने देश हादरला – Marathi News | Azamgarh Murders : Man Kills Wife, Son, Priests During Puja; Dies in Police Encounter


उत्तर प्रदेशातील आजमगडमधील हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. आजमगडच्या शंभूपूर गहजी गावात एका व्यक्तीने त्याची पत्नी, मुलगा आणि पूजेसाठी आलेल्या दोन पुरोहितांची गोळी घालून हत्या केली आहे. घरात पूजा सुरू असतानाच हा खूनी खेळ खेळला गेला. एकाचवेळी चार जणांची हत्या करणाऱ्या अरविंदचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. तसेच त्याच्या दोन मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अरविंदची पत्नी बबीता सिंहने घरात महामृत्यूंजय पठनाचं आयोजन केलं होतं. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदचा भाऊ सुनील सिंहची हत्या झाली होती. त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून धार्मिक अनुष्ठानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पूजेच्यावेळी घरी दोन पुरोहित महेंद्र पाठक आणि अखिलेश मिश्रा उपस्थित होते. यावेळी अरविंद बाजारातून घरात आला. घरात महामृत्यूंजयचा जप सुरू असल्याचं पाहून त्याने पुरोहितांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यांना प्रश्न विचारून भांडावून सोडलं. त्याने या दोन्ही पुरोहितांकडे आधार कार्ड मागितल्याचा आरोप आहे. पुरोहित आणि अरविंद यांच्यातील वाद विकोपाला गेला. तणाव वाढला आणि त्यातून हे महाभयंकर हत्याकांड घडल्याचं सांगितलं जात आहे.

आधी बायकोला गोळी घातली

पुरोहितांशी वाद सुरु असताना अरविंदचा भलताच पारा चढला. तो रूममध्ये गेला. त्याने त्याची रायफल काढली. त्यानंतर त्याने सर्वात आधी पत्नी बबीताला गोळी घातली. त्यानंतर त्याने पूजा करणाऱ्या दोन्ही पुरोहितांना गोळी घातली. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी धावत पळत घटनास्थळी आले. घराच्या बाहेर मोठी गर्दी होत असल्याचं पाहून अरविंदने तिन्ही मुलांना सोबत घेतलं आणि घरातील एका खोलीत जाऊन स्वत:ला बंद करून घेतलं.

सात तास पोलिसांचं ऑपरेशन

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घराची घेराबंदी केली. अधिकाऱ्यांनी अरविंदला सरेंडर व्हायला सांगितलं. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एडीजी नवीन अरोडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नातेवाईक आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याच्याशी सातत्याने संवाद साधला. पण तो बाहेर यायचं नाव घेत नव्हता. तो वारंवार मुलांना ढाल बनवत होता. पोलिसांनाच मागे हटण्यास सांगत होता. तब्बल सात तासानंतर खोलीतून गोळी सुटल्याचा आवाज आला. मुलांच्या जीवाला धोका झाला की काय असं आम्हाला वाटलं.

त्यानंतर पोलिसांनी स्टन ग्रेनेड आणि अश्रूधुराचा वापर केला. दरवाजा तोडून पोलीस आत घुसले. पोलिसांच्या दाव्यानुसार आत पोहोचताच अरविंदने पोलिसांवर अनेक राऊंड फायरिंग केली. त्यावेळी त्याची मोठी मुलगी मध्ये आली. छोटी मुलगी हातातून पडली. मुलाला आधीच गोळी लागलेली होती. मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या प्रयत्नात पोलिसांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यात अरविंद जखमी झाला. त्याला आणि त्याच्या जखमी मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण घटनेत, अरविंद, त्याची पत्नी, दोन पुरोहित आणि त्याचा मुलगा अशा पाच जणांचा मृत्यू झाला. त्याच्या दोन्ही मुलींना पोलिसांनी वाचवलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *