Last Updated:
“परिसरात सोने चोरी करणारे लोक फिरत आहेत, त्यामुळे तुमचे दागिने काढून ठेवा,” असं म्हणत दोघांनी महिलेची मदत करत असल्याचं भासवलं
पुणे : धार्मिक क्षेत्र असलेल्या जेजुरीमध्ये भामट्यांनी एका महिलेला हातचलाखीने लुटल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. “परिसरात सोने चोरी करणारे लोक फिरत आहेत, त्यामुळे तुमचे दागिने काढून ठेवा,” असं म्हणत दोघांनी महिलेची मदत करत असल्याचं भासवलं. मात्र, हे दागिने चोरणारे दुसरे तिसरे कोणी नसून हेच दोन भामटे होते. हे या महिलेला कळेपर्यंत बराच उशीर झाला होता. या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत महिलेनंही आपले दागिने लपवून ठेवण्यासाठी काढले. मात्र, ते कधी गायब झाले हे महिलेलाही समजलं नाही. या प्रकरणी कुसुम प्रकाश भुजबळ (रा. दौंडज, सध्या रा. विद्यानगर, जेजुरी) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.
ही घटना १८ तारखेला सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जेजुरी-सासवड महामार्गालगत असलेल्या हॉटेल शिवानंद शेजारील एका टपरीमध्ये फिर्यादी कुसुम भुजबळ बसल्या होत्या. त्याच वेळी दोन अज्ञात भामटे त्यांच्याजवळ आले. त्यांनी अत्यंत हुशारीने महिलेशी संवाद साधत परिसरात चोरांचा सुळसुळाट झाल्याची आवई उठवली आणि अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवण्याचा सल्ला दिला.
भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुसुम यांनी आपल्या कानातील ४ ग्रॅम वजनाचे कर्णफुले आणि गळ्यातील ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढून रुमालात गुंडाळण्यास सुरुवात केली. याच वेळी त्या दोघांनी “आम्ही तुमचे दागिने व्यवस्थित रुमालात गुंडाळून देतो,” असा बहाणा केला. महिलेची नजर चुकवून त्यांनी अत्यंत चलाखीने सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तिथून पोबारा केला.
रुमाल उघडून पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. जेजुरी पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Pune,Maharashtra
