मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा – Marathi News | Actress shubha godbole diagnosed with cancer posts journey of treatment chemotherapy


मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. आयुष्यातील काही प्रवास तुम्हाला कायमचे बदलून टाकतात, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर आता आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्रीने कॅन्सरचं निदान झाल्याचा खुलासा करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी इन्स्टाग्रामवर कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासाविषयी पोस्ट लिहिली आहे. तेव्हाच्या आणि आताच्या माझ्या फोटोंकडे पाहून मला या गोष्टीची जाणीव झाली आहे की, सर्वांत मोठा बदल फक्त माझ्या केसांमध्येच झाला नाही, तर माझ्यात झाला.. अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या आहेत.

शुभा गोडबोले यांची पोस्ट-

‘जेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं, तेव्हा मला त्याबद्दल बोलायचं नव्हतं. मी फोन आणि संवाद टाळले. त्यावेळी मी फक्त भविष्याकडे पाहत राहिले. मी बरं झाल्यावर काय करेन, पुढचा प्रवास, पुढची स्वप्नं, मला आवडणाऱ्या गोष्टी आणि मला जगायचं असलेलं आयुष्य.. यांविषयीच मी कल्पना करत राहिले. माझं लक्ष नेहमीच पुढच्या गोष्टींवर केंद्रीत होतं. कॅन्सरची लढाई जितकी शारीरिक असते, तितकीच ती मानसिकसुद्धा असते. या प्रवासात मला ‘स्वीकार’ करण्याची ताकद समजली. एकदा का तुम्ही सर्वांत वाईट परिस्थिती स्वीकारली, की त्यापेक्षा चांगली कोणतीही गोष्ट एखाद्या बोनससारखीच वाटते. मग मी एक निर्णय घेतला की, कॅन्सर ही माझी ओळख बनणार नाही’, असं त्यांनी लिहिलं आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘मी माझ्या आरोग्याची काळजी घेईनच, पण माझ्या स्वप्नांनाही जपेन. मी प्रवास करेन, हसेन, प्रेम करेन, मनसोक्त जगेन आणि नेहमीच भविष्याकडे पाहत राहीन. मी नेहमीच इतकी खंबीर होते का? तर नाही. मी नेहमीच निर्भय होते का? मुळीच नाही. मला भीती वाटली का? हो, काही वेळा वाटली. यातून मला ही गोष्ट समजली की मानसिकदृष्ट्या खंबीर असणं म्हणजे कधीच भीती न वाटणं नव्हे, तर भीतीला तुमच्या आशा हिरावून घेऊ न देणं, म्हणजे खंबीर असणं. आज मागे वळून पाहताना मला फक्त डोक्यावर पुन्हा येणारे केस दिसत नाहीत. मला हा एक प्रवास दिसतो. मी काय सहन केलं, काय गमावलं, काय शिकले? आणि मला हेही आठवतं की मी यातून बाहेर पडले.’

‘माझी कहाणी सांगण्याने जर कॅन्सरचा सामना करणाऱ्या एक जरी व्यक्तीला थोडं धैर्य, थोडी आशा मिळाली किंवा त्यांना थोडं कमी एकटं वाटलं, तर ती नक्कीच सांगण्यासारखी होती. माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या, माझ्यासाठी प्रार्थना केलेल्या, मला पाठिंबा दिलेल्या, माझी विचारपासून केलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद. मी इथे आहे, मी बरी बरी होत आहे आणि हो.. मला माझे केमो कर्ल्स खूप आवडत आहेत.. आणि हो.. मला कॅन्सर सर्व्हाइव्हर (कॅन्सरमधून वाचलेली) हे शब्द काही केल्या आवडत नाहीत. त्याऐवजी कॅन्सर कॉन्करर (कॅन्सरवर विजय मिळवणारी) म्हणायला मला जास्त आवडेल,’ अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *