Mumbai News: राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना फोन टॅप करत असल्याचा इशारा दिला आहे. यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले असून आज काँग्रेसनही भाजपवर जोरदार टीका केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सध्या राज्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. बावनकुळेंनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या कार्यकर्त्यांना एक इशारा दिला आहे. तो म्हणजे सर्वांचे फोन टॅप करत असल्याचा. आगामी निवडणुका लक्षात घेत पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर याद राखा, सर्वांचे फोन सर्विलन्सवर टाकलेले आहेत, असे ते म्हणाले आहेत. तुम्ही कोणाशी काय बोलता, कोणाशी काय संवाद साधता हे सर्व आम्हाला समजते, असं बावनकुळे म्हणाले होते.
फोन टॅप करण्याच्या प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेमधील त्यांच्याच मित्रपक्षांवर भाजप पाळत ठेवत आहे. माबाईल सर्विलन्सवर टाकणे हे भाजपसाठी नवीन नाही. भाजपने यापूर्वीही पेगॅसेससारखे प्रकार केले आहेत. राज्यात रश्मी शुक्ला या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन जवळपास 50 नेत्यांचे फोन बेकायदेशिरपणे टॅप केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले पण, फडणवीस सत्तेत आले की पुन्हा शुक्लांना पोलीस प्रमुखपदी बढती मिळाली. फोन टॅपिंगवर पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, “भाजपवाले आते विरोधकांच्या बाथरुम, संडासमध्येही कॅमेरे लावायला मागेपुढे पाहणार नाही, कारण ते संस्कृती सभ्यतेच्या पुढे गेले आहेत. ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे. चंद्रशेखर बावनकुळे आता लवकरच त्यांच्या विधानावर घुमजावही करतील.”, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली, ही घटना पोलिस विभागाला लाज आणणारी आहे, गृहविभागाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृहविभागावर नियंत्रण नाही. याची लाज बाळगून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहीजे, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, अशी टीका हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा