पेपरफुटीविरोधात PM मोदींची मोठी घोषणा, आणखी कठोर कारवाई; शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय, पुढील आठवड्यात संसदेत विधेयक आणणार | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

PM Narendra Modi: NEET पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकार आणखी कठोर भूमिका घेणार असून, उद्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आठवड्यात संसदेत पेपरफुटीविरोधी कठोर विधेयक आणण्याची घोषणाही केली आहे.

News18
News18

नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर केंद्र सरकार आणखी कठोर पावले उचलणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. पेपरफुटी हा सामान्य मुद्दा नसून लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्याशी संबंधित अत्यंत वेदनादायी विषय आहे, असे सांगत त्यांनी येत्या काही दिवसांत आणखी ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

गुरुवारी उशिरा रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पंतप्रधान मोदी यांनी “More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet!” या शीर्षकाचा एक व्हिडिओ संदेश शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील अधिक कठोर उपायांवर चर्चा होणार आहे.

यावेळी त्यांनी पुढील आठवड्यात संसदेत पेपरफुटीविरोधातील कारवाई अधिक मजबूत करण्यासाठी नवीन विधेयक (Bill) सादर करण्याचाही सरकारचा मानस असल्याचे जाहीर केले.

‘पेपरफुटी हा सामान्य विषय नाही’

पंतप्रधान मोदी म्हणाले, पेपरफुटी हा सामान्य विषय नाही. हा लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत वेदनादायी विषय आहे. गेल्या अडीच महिन्यांत या प्रकरणातील अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच पुनर्परीक्षा (Re-examination) शक्य तितक्या लवकर घेण्यात यावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी व्हिडिओ संदेश

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ संदेश अशा वेळी आला आहे, जेव्हा कॉकरोच जनता पक्ष (Cockroach Janta Party – CJP) चे शिष्टमंडळ शुक्रवारी केंद्र सरकारमधील मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 12 नंतर ही बैठक होणार असून बैठकीचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

पेपरफुटीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चांना वेग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NEET पेपरफुटी प्रकरणावरून निर्माण झालेला तणाव आणि पेचप्रसंग दूर करण्यासाठी सरकार आणि संबंधित पक्षांमध्ये पडद्यामागे सातत्याने चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे.

जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच

कॉकरोच जनता पक्ष (CJP) गेल्या महिन्यापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात यावेत.

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या घोषणेमुळे आता केंद्र सरकार पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजना करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

मराठी बातम्या/देश/

पेपरफुटीविरोधात PM मोदींची मोठी घोषणा, आणखी कठोर कारवाई; शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय, पुढील आठवड्यात संसदेत विधेयक आणणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *