2030 चा FIFA विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात वेगळा आणि ऐतिहासिक स्पर्धा ठरणार आहे. विश्वचषकाच्या 100 वर्षांच्या निमित्ताने ही स्पर्धा सहा देश आणि तीन खंडांमध्ये आयोजित केली जाणार आहे. सुरुवातीचे सामने दक्षिण अमेरिकेत खेळवले जातील, त्यानंतर उर्वरित स्पर्धा युरोप आणि आफ्रिकेतील यजमान देशांमध्ये होईल.
FIFA च्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार, 8 आणि 9 जून 2030 रोजी उरुग्वे, अर्जेंटिना आणि पराग्वे येथे शताब्दी (Centenary) सामने खेळवले जातील. यानंतर 13 आणि 14 जून रोजी मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन येथे मुख्य उद्घाटन सोहळा आणि स्पर्धेचे अधिकृत सामने सुरू होतील. विश्वचषकाची अंतिम फेरी 21 जुलै 2030 रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र FIFA ने अद्याप संपूर्ण अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
स्पर्धेचे प्रमुख यजमान स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को असतील. मात्र विश्वचषकाच्या 100 वर्षांच्या स्मरणार्थ उरुग्वे, अर्जेंटिना, पराग्वे या प्रत्येक देशात उद्घाटन फेरीतील प्रत्येकी एक सामना खेळवला जाईल.
FIFA च्या मते उरुग्वेला 1930 मधील पहिल्या विश्वचषकाचे यजमानपद मिळाल्याच्या स्मरणार्थ एक सामना देण्यात आला आहे. अर्जेंटिनाला पहिल्या विश्वचषकातील उपविजेतेपदाच्या स्मरणार्थ सामना मिळणार आहे. पराग्वेला दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघ (CONMEBOL) चे मुख्यालय असल्यामुळे हा मान मिळाला आहे. यामुळे पुरुषांच्या FIFA विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा सहा देश आणि तीन खंडांमध्ये खेळवली जाणार आहे.
यजमान म्हणून खालील सहा देशांनी थेट पात्रता मिळवली आहे.
स्पेन
पोर्तुगाल
मोरोक्को
उरुग्वे
अर्जेंटिना
पराग्वे
याशिवाय उर्वरित 42 जागांसाठी विविध खंडांतील पात्रता स्पर्धा होणार आहेत.
दक्षिण अमेरिकेत शताब्दी सामने खेळणाऱ्या संघांना पुढील गट सामन्यांपूर्वी अतिरिक्त प्रवास आणि विश्रांतीसाठी वेळ दिला जाईल.
8-9 जून: उरुग्वे, अर्जेंटिना, पराग्वे येथे शताब्दी सामने
13-14 जून: मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये मुख्य उद्घाटन
15-16 जून: संबंधित गटांतील इतर संघांचे सामने
21-22 जून: त्या गटांतील दुसरी फेरी
संपूर्ण वेळापत्रक FIFA नंतर जाहीर करणार आहे.
सध्या 2030 चा विश्वचषक 48 संघांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. हा फॉरमॅट प्रथम 2026 विश्वचषकात (अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको) वापरण्यात आला. मात्र FIFA अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी स्पर्धेत 64 संघांचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल, असे सांगितले आहे. जर असे झाले तर या स्पर्धेत भारताला खेळण्याची संधी मिळू शकते. कारण संघाची संख्या वाढल्याने पात्रता फेरीतून अधिक संघ मुख्य स्पर्धेसाठी निवडले जातील.
स्वित्झर्लंडमधील Bluewin या माध्यमाशी बोलताना इन्फँटिनो म्हणाले की, 48 संघांचा फॉरमॅट अत्यंत यशस्वी ठरला असून त्यामुळे अधिक देशांना विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली. लहान फुटबॉल राष्ट्रांनीही 2026 स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली त्यामुळे स्पर्धा अधिक व्यापक करण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवला जाईल.
1924 आणि 1928 च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये फुटबॉलला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर FIFA ने स्वतंत्र विश्वचषक सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उरुग्वेने सुवर्णपदक जिंकले होते.
1924: उरुग्वेने स्वित्झर्लंडचा 3-0 असा पराभव केला.
1928: उरुग्वेने अर्जेंटिनाला 2-1 ने हरवून सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले.
या यशानंतर मे 1928 मध्ये FIFA ने पहिला विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि उरुग्वेची यजमान म्हणून निवड केली.
पहिला विश्वचषक जुलै 1930 मध्ये झाला.
सहभागी संघ: 13
अंतिम सामना: उरुग्वे विरुद्ध अर्जेंटिना
निकाल: उरुग्वे 4-2 अर्जेंटिना
हा सामना माँटेव्हिडीओच्या एस्टाडिओ सेंटेनारियो स्टेडियमवर खेळवण्यात आला आणि उरुग्वे पहिला विश्वविजेता ठरला.
विश्वचषकाचा वाढता विस्तार
1930 मध्ये फक्त 13 संघ सहभागी होते.
1998 – 32 संघ
2026 – 48 संघ
2030 – 48 संघ (सध्या निश्चित), मात्र 64 संघांचा प्रस्ताव विचाराधीन
2030 ची स्पर्धा विश्वचषकाच्या 100 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा साजरा करणार असून ती सहा देश आणि तीन खंडांवर खेळवली जाणारी पहिली पुरुषांची विश्वचषक स्पर्धा असेल.
2030 नंतरचा पुढील पुरुषांचा FIFA विश्वचषक 2034 मध्ये सौदी अरेबियामध्ये होणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये FIFA ने सौदी अरेबियाची अधिकृत यजमान म्हणून घोषणा केली होती. यासाठी सौदी अरेबियाच एकमेव बोली लावणारा देश होता. 2030 प्रमाणे अनेक देशांमध्ये ही स्पर्धा होणार नसून 2034 चा विश्वचषक एकाच देशात आयोजित केला जाईल. मात्र त्याचे अधिकृत वेळापत्रक आणि सामने कधी होणार, याची घोषणा FIFA कडून अद्याप करण्यात आलेली नाही.