पाऊस पडायला लागला की कडक उन्हाळ्यापासून दिलासा मिळतो. पावसाळा ऋतू सुरू झाला की वातावरण जेवढे आल्हाददायक वाटते तेवढेच पावसाळ्यातील समस्या देखील डोकं वर काढायला सुरूवात करतात. कारण या दिवसांमध्ये हवेतील आर्द्रताही वाढते. पावसाळ्यात तापमान जास्त नसतानाही घरात दमट आणि चिकटपणा जाणवू शकतो. त्यामुळे अस्वस्थता जाणावते. आर्द्रता म्हणजे हवेत असलेली अतिरिक्त पाण्याची वाफ, जी घरातील भिंती, फर्निचर, कपडे आणि इतर वस्तूंमध्ये साचू लागते. याचा परिणाम फक्त वातावरणावरच नाही तर आरोग्यावरही होतो. दमट हवेमुळे शरीरात थकवा, घाम जास्त येणे, त्वचेवर चिकटपणा, आणि श्वास घेण्यास त्रास यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त आर्द्रतेमुळे दुर्गंधीही येऊ शकते. तर यावर उपाय म्हणून कोणतेही रूम फ्रेशनर वापरण्या ऐवजी एसी या समस्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो. खोली थंड करण्याव्यतिरिक्त एसी हवेतील काही ओलावा देखील काढून टाकतो. तुम्ही एसीचा वापर कसा करता यावर तो आर्द्रता किती प्रभावीपणे नियंत्रित करतो हे अवलंबून असते.
योग्य मोड, तापमान आणि फॅन सेटिंग्ज वापरल्याने मोठा फरक पडू शकतो. पावसाळ्यात आर्द्रता अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यासाठी एसी वापरण्याकरिता आजच्या लेखात काही टिप्स दिल्या आहेत त्याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
ड्राय मोड
अनेक एसींमध्ये ‘ड्राय मोड’ असतो, जो हवेतील आर्द्रता कमी करण्यासाठी तयार केलेला असतो. जेव्हा हा मोड चालू असतो, तेव्हा एसी नेहमीच्या कूलिंग मोडपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो आणि खोलीला जास्त थंड न करता अतिरिक्त आर्द्रता काढून टाकतो.
एसीचे तापमान 24 ते 26 अंशांच्या दरम्यान ठेवा
तुमचा एसी 16°C किंवा 18°C सारख्या खूप कमी तापमानावर सेट करू नका. त्याऐवजी तापमान 24°C ते 26°C च्या दरम्यान ठेवा. यामुळे एसी खोली थंड करण्यासोबतच हवेतील आर्द्रता देखील काढून टाकतो.
एसी फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा
पावसाळ्यात एसीच्या फिल्टरवर धूळ आणि ओलावा साचू शकतो. घाणेरड्या फिल्टरमुळे हवेचा प्रवाह अडतो आणि एसीची ओलावा काढून टाकण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे दुर्गंधीसुद्धा येऊ शकते. फिल्टर नियमितपणे तपासावेत आणि स्वच्छ करावेत.