Maharashtra FDA: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या नोटीस प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पान मसालाच्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या तीन दिग्गज अभिनेत्यांपैकी अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांनी महाराष्ट्र FDA कडे आपले अधिकृत लेखी उत्तर सादर केले आहे. मात्र, या प्रकरणातील तिसरा अभिनेता शाहरुख खान याचे उत्तर अद्याप FDA कडे प्राप्त झालेले नाही.
का दिली होती नोटीस?
महाराष्ट्र FDA ने शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ या तिघांनाही पान मसाला जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. FDA च्या प्राथमिक संशयानुसार, जाहिरात प्रत्यक्षात राज्यात बंदी असलेल्या पान मसाल्याची अप्रत्यक्ष किंवा ‘सरोगेट’ (Surrogate Advertising) जाहिरात आहे. महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीवर व जाहिरातींवर बंदी आहे. अशा परिस्थितीत ही जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आक्षेप एफडीएने नोंदवला आहे.
कधी बजावली होती नोटीस?
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने 11 ऑगस्ट 2026 रोजी या तिन्ही अभिनेत्यांना ही कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या नोटीसद्वारे तिघांनाही आपले म्हणणे मांडण्यासाठी आणि आक्षेपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देऊन लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आधी काय घडलं होतं?
या प्रकरणावर बोलताना 26 ऑगस्ट रोजी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली होती की, नोटीस देऊनही त्यावेळी तिन्ही अभिनेत्यांकडून कोणतेही उत्तर एफडीएला प्राप्त झाले नव्हते. मात्र आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांनी मुदतीनंतर आपले उत्तर दाखल केले असून, आता एफडीएला केवळ शाहरुख खानच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. शाहरुख खान यावर काय भूमिका घेतो आणि एफडीए पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या