पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन! – Marathi News | Shirdi mp bhausaheb wakchaure said entered into shiv sena because of constituency development


Bhausaheb Wakchaure : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचादेखील समावेश आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, त्यांनी सांगितले. दरम्यान, पक्षबदलानंतर भाऊसाहेब वाकचौरे आपल्या शिर्डी या मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शिर्डीत दाखल झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. तसेच बंडखोरीचा निर्णय नेमका कशासाठी घेतला? याचेही उत्तर त्यांनी दिले आहे. पक्षबदलानंतर त्यांची भावी वाटचाल कशी असेल, यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

माझ्या मतदारसंघात मी पाय ठेवणारच

माझ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मी घेतलेला निर्णय योग्य आहे टीका करणारे थोडे आणि आनंद व्यक्त करणारे जास्त आहेत. मी मतदारसंघात फिरणारच आहे. माझ्या मतदारसंघात मी पाय ठेवणारच आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. वाकचौरे यांना मतदारसंघात पाय ठेवून देणार नाही, असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी दिला होता.

प्रलंबित प्रश्नांसाठी आता निधी आणता येईल

पक्षांतराचा निर्णय का घेतला, याची माहिती देताना, मतदारसंघाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी मी हे पाऊल उचलले आहे. मतदारसंघात अनेक प्रोजेक्ट आणायचे आहेत. प्रलंबित प्रश्नांसाठी आता निधी आणता येईल. निधी खर्च न केल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. 9 कोटी 54 लाख निधी मंजूर झालेला आहे. त्यातील अनेक कामे प्रस्तावित आहेत. डीपीडीसी आणि खासदार निधीतून अनेक कामे मंजूर आहेत, अशी माहितीच त्यांनी दिली.

राजकारणात चांगलं आणि वाईट, हे निवडणूक ठरवते

बंडखोरी केलेल्या खासदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आले, असा आरोप केला जातोय. यावर बोलताना, पैसे कोण देतंय आणि कोण घेते हे आरोप करणाऱ्यांनाच माहीत असेल. केले जाणारे आरोप धादांत चुकीचे आहेत. आम्ही सहाजण मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबत गेलो, अशी भूमिका वाकचौरे यांनी मांडली. तसेच राजकारणात चांगलं आणि वाईट, हे निवडणूक ठरवते. हा मतदारांचा विश्वासघात नाही, तर त्यांच्याच कामासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझ्या दृष्टीने हा विश्वासघात नाही, असे मत त्यांनी मांडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *