ते माझं हक्काचं घर, मी कधीही तिथे..; निवेदिता सराफ यांच्याबद्दल स्पष्टच बोलली तेजश्री प्रधान – Marathi News | Tejashri pradhan opens up on bond with nivedita saraf said she can go anytime at her home to eat


काही नाती ही केवळ पडद्यापुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती मनामनांत जपली जातात. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांचं नातं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेदरम्यान पडद्यावर सासू-सुनेची भूमिका साकारताना दोघींमध्ये निर्माण झालेला जिव्हाळा आजही तितकाच घट्ट आहे. आता निवेदिता सराफ ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत कृष्णाईच्या भूमिकेतून झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करत असताना, या दोघींना पुन्हा एकत्र भेटण्याची खास संधी मिळाली.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान नुकतीच ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेच्या प्रमोशनल शूटसाठी सेटवर पोहोचली. कृष्णाई आणि तिच्या लेकींसोबत खानावळीच्या सेटवर चित्रीकरण करताना तेजश्रीच्या मनात ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेच्या अनेक आठवणी जागृत झाल्या. निवेदिता ताईंना भेटून आणि त्यांच्यासोबत पुन्हा शूटिंग करताना जुन्या दिवसांची आठवण ताजी झाल्याचं तेजश्रीने सांगितलं.

याबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली, “निवेदिता ताईंना भेटण्याचा अनुभव नेहमीच खास असतो. ‘कृष्णाईच्या लेकी’ सेटवर क्रॉस प्रमोशनसाठी गेले होते आणि खूप मजा आली. ‘अग्गंबाई सासूबाई’च्या दिवसांच्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पहिल्या प्रोमो शूटच्या दिवशीच आमचं इतकं छान जुळून आलं होत आणि इतक्या गप्पा आम्ही मारत होतो कि डॉ. गिरीश ओक यांनी ‘संपूर्ण मालिकेसाठी थोड्या गप्पा राखून ठेवा’ असं म्हटलं होतं आणि आम्ही सगळे खळखळून हसलो होतो. तो प्रसंग आजही लक्षात आहे.”

तेजश्री पुढे म्हणाली , “कृष्णाईच्या तीनही लेकी खूप छान आहेत. संपूर्ण टीम खूप उत्तम आहे. झी मराठी नेहमी वास्तववादी विषय आणि भावना प्रेक्षकांसमोर आणतं. निवेदिता ताई आणि मी पुन्हा एकदा झी मराठीवर एकत्र आलो आहोत, याचा आम्हा दोघींनाही आनंद आहे. सेट, दिग्दर्शन टीम, डीओपी आणि विशेषतः खानावळीचा सेट अप्रतिम तयार करण्यात आला आहे. त्यातील बारकावे खूप सुंदर आहेत.”

निवेदिता सराफ यांच्याबद्दलचा आपला जिव्हाळा व्यक्त करताना तेजश्री म्हणाली, “मला निवेदिता ताई खूप आवडतात. त्या अतिशय बुद्धिमान आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांची ऊर्जा वेगळीच आहे. त्यांच्या आसपास काम करताना सकारात्मकता जाणवते. त्यांच्यात काहीतरी खास आहे. त्यांची आणखी एक सुंदर सवय म्हणजे तुम्ही खायची एखादी आवडीची गोष्ट सहज बोलून जाता आणि विसरूनही जाता. पण त्या ते लक्षात ठेवतात. दोन-तीन दिवसांनी स्वतः ती गोष्ट बनवून घेऊन येतात आणि म्हणतात, ‘तुला हे खायचं होतं ना!’ इतका त्यांचा आपुलकीचा स्वभाव आहे. त्या माझ्यासाठी इतक्या जवळच्या आहेत की मला मासे खायची इच्छा झाली तर मी कधीही त्यांच्या घरी जाऊ शकते. ते माझं हक्काचं घर आहे.”





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *