कोल्हापूर : राज्यात एकीकडे विधानपरिषद निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे चित्रपड महामंडळाच्या निवडणुकीत राजकारण शिरल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मला चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जच भरू दिला नाही, राजकीय दबावातून ही निवडणूक सुरू असून एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापुरात तळ ठोकून बसलाय, असा गंभीर आरोप अभिनेता विजय पाटकर यांनी केला होता. विजय पाटकर यांच्या आरोपांना विरोधी उमेदवार मेघराज राजेभोसलेंनी उत्तरही दिले. मात्र, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma andhare) आज पुन्हा आरोप करत या निवडणुकीवरुन टीका केली. त्यावर, आता अभिनेता सुशांत शेलार यांनी पलटवार केला आहे. तसेच, विजय पाटकर (Vijay patkar) यांच्यावरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही त्यांनी केले.
विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्र ही बळकावत असतील तर मात्र दुर्दैवी आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी या निवडणुकीवरुन शिवसेना पक्षातील नेत्यांवर टीका केली होती. आता, त्यावरुन शिवसेनेच्या सुशांत शेलार यांनी प्रत्त्युत्तर दिलंय.
चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सुशांत शेलार यांनी महामंडळाचे माजी संचालक विजय पाटकर यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. विजय पाटकर यांचे संचालकपद न्यायालयाने रद्द केले आहे, त्यांना अर्ज भरू दिला नाही, एका मंत्र्याने अर्ज भरत असताना दबाव टाकल्याचं त्यांचं म्हणणं हे चुकीच आहे, असे शेलार यांनी म्हटलं. तसेच, विजय पाटकर यांनी खोटे आरोप करू नयेत, असेही ते म्हणाले. विजय पाटकर यांच्या कार्यकाळात मानाचा मुजरा कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेलार यांनी केला. 15 ते 16 लाखांत होणारा कार्यक्रम तब्बल 57 लाख रुपयांत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ऑडिटमध्ये 10 लाख 78 हजार रुपयांचा फरक आढळल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी इमारती उभारल्या आहेत. मागील 60 वर्षांत न्यासाने खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक खर्चाची माहिती देण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यामुळे काही विकासकामे तात्पुरती थांबली होती, असेही शेलार यांनी सांगितले. तर, अभिनेत्री नीलम शिर्के या सुरुवातीपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
सुशांत शेलारांचा सुषमा अंधारेंना टोला
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रियेवरही सुशांत शेलार यांनी जोरदार टीका केली. “नीलम शिर्के ह्या अभिनेत्री असल्याने त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग तुम्ही अभिनेत्री व्हा आणि तुम्हीसुद्धा उमेदवारी अर्ज भरा, मान अशी आणि तशी केल्यामुळे आपण स्वतःला अभिनेत्री समजता का? असा टोला शेलार यांनी सुषमा अंधारेंना लगावला.
हेही वाचा
आणखी वाचा