Last Updated:
आता या संपूर्ण वादावर सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी समोर येत एक धक्कादायक स्पष्टीकरण दिले आहे आणि व्हायरल फोटोमागची वेगळीच कहाणी सांगितली आहे.
पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडाने आधीच संपूर्ण राज्य हादरवून सोडले आहे. अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या एका व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर नवा गदारोळ निर्माण झाला. पोलिसांच्या उपस्थितीत सियाने माध्यमांसमोर मधले बोट दाखवल्याचा दावा केला जात होता, ज्यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, आता या संपूर्ण वादावर सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी समोर येत एक धक्कादायक स्पष्टीकरण दिले आहे आणि व्हायरल फोटोमागची वेगळीच कहाणी सांगितली आहे.
सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सोशल मीडियावरील सर्व दावे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “ज्या दिवशी पोलीस सियाला तपासासाठी घरी घेऊन आले होते, त्या दिवशी गाडीतून उतरताना तिची दोन बोटे कारच्या दारात अडकली होती. या अपघातामुळे तिची बोटे प्रचंड सुजली होती आणि नखेही निळी पडली होती. त्यामुळे तिच्या हाताची ती स्थिती कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याला चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.”
प्रवीण गोयल यांनी पुढं असंही म्हटलं की, जर कोणाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, तर त्यांनी त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी करावी.
केतनच्या हत्येची सियाकडून रिहर्सल, डिजिटल पुरावे मिळाले pic.twitter.com/0wJ2hASvDy
— News18 Marathi (@News18_marathi) July 2, 2026
दरम्यान या मर्डर केसमध्ये दररोज नवे खुलासे होत आहेत. दोन्ही आरोपी सिया आणि चेतन गेल्या दीड महिन्यापासून या हत्येचा सराव करत होते आणि गुन्ह्यासाठी सांकेतिक शब्दांचा वापर करत होते, हे आधीच समोर आले आहे. त्यातच आता सिया आणि तिच्या मित्राचे एक स्नॅपचॅट चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. २५ मे रोजी झालेल्या या संभाषणात, “तुझं विमानाचं तिकिट काढते. लग्न तसंही होणार नाही…” असं एक वाक्य सियाने लिहिलेलं आहे. या एकाच वाक्याने आता संपूर्ण तपास यंत्रणेला चक्रावून सोडले असून पोलीस या चॅटचा कसून तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Pune,Maharashtra
‘तिने मिडल फिंगर दाखवली नव्हती, तिचा हात…’, सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल फोटोवर सिया गोयलच्या वडिलांचं स्पष्टीकरण
