ट्रम्प यांचा एक फोन आणि फिफाची माघार! अमेरिकन खेळाडूवरची बंदी उठवली, बेल्जियमचा संताप – Marathi News | Ban on American footballer Folarin Balogun lifted after Trump call Belgium furious with FIFA


ट्रम्प यांचा एक फोन आणि फिफाची माघार! अमेरिकन खेळाडूवरची बंदी उठवली, बेल्जियमचा संतापImage Credit source: GETTY IMAGES

फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील राउंड ऑफ 16 चे सामने सुरू आहे. या सामन्यात विजयी संघांना उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होणार आहे. असं असताना प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. राउंड ऑफ 16 मध्ये बेल्जियमचा सामना अमेरिकेशी होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच वादाला फोडणी मिळाली आहे. अमेरिकन फुटबॉलपटू फोलारिन बालोगुन याच्यावरील बंदी उठवल्याने बेल्जियमने नाराजी व्यक्त केली आहे. बंदी उठवल्याने बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची त्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे बेल्जियमचा संताप झाला आहे. फिफाच्या या निर्णयानंतर बेल्जियमने फिफा ट्रम्पपुढे झुकल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टनुसार, बालोगुनवरील बंदी उठवण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांच्यात फोनवरून झालेल्या चर्चेनंतर घेतला गेला.

ट्रम्पच्या फोनमुळे बालोगुनवरील बंदी काढली!

रिपोर्टनुसार, फिफा अध्यक्षांचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा झाली होती. तेव्हा ट्रम्प यांनी बालोगुनबाबत पुनर्विचार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर फिफाने बालोगुनवरील रेड कार्ड रद्द तर केलं नाही. पण त्याला पुढच्या सामन्यात खेळण्याची संधी दिली आहे. फिफाने स्पष्ट केलं की, बालोगुनचं निलंबन एका वर्षासाठी तात्पुरते हटवले आहे. या कालावधीत बालोगुनने पुन्हा चूक केली तर त्याला माफ केलं जाणार नाही. त्याला शिक्षा भोगावी लागेल. फिफाच्या न्यायिक मंडळाला शिस्तभंगाची कारवाई पूर्णपणे किंवा अंशत: रद्द करण्याचा अधिकार आहे.

ट्रम्प यांनी मानले फिफाचे आभार

अमेरिकन फुटबॉलपटू बालोगुनवरील बंदी उठवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफाचे आभार मानले. त्यांनी आपल्या सोशल मिडिया खात्यावर लिहिलं की, योग्य गोष्ट केल्याबद्दल आणि गंभीर अन्याय दूर केल्याबाबत फिफाचे आभार.

फिफाला लाज वाटायला हवी- बेल्जियम

बोस्निया आणि हर्झेगोविना विरूद्धच्या सामन्यात फोलारिन बालोगुनवर एका महिन्याची बंदी घातली होती. त्या सामन्यात त्याला रेड कार्ड दाखवलं गेलं होतं. त्यामुळे पुढच्या सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. पण बालोगुनवरील बंदी उठवल्याने बेल्जियम राजकारणी आणि फुटबॉल अधिकाऱ्यांनी फिफावर टीकेची तोफ डागली. हा निर्णय लज्जास्पद आणि विश्वचषकाची प्रतिमा डागाळणारा असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिका आणि बेल्जियम यांच्यातील राउंड 16 चा सामना 7 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता होणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *