क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हणून ओळखलं जाते. शिस्त, संयम आणि खिलाडूवृत्ती हे या खेळाचे दागिने आहेत. पण याच खेळाच्या इतिहासात एक असं पानही जोडलं गेलं आहे, ज्याने संपूर्ण क्रीडा जगताला कायमचा कलंक लावला. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवान गोलंदाजाने रागाच्या भरात आपल्याच पत्नीला गोळ्या झाडून संपवलं आणि या गुन्ह्यासाठी त्याला थेट फाशीच्या सुळावर चढावं लागलं. क्रिकेट जगताला हादरवून सोडणारी ही सत्यकथा वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू लेस्ली हिल्टन (Leslie Hylton) यांची आहे.
मैदानावरील ‘हिरो’ ते थेट फाशीच्या सुळावर चढावं लागलं
1930 आणि 1940 च्या दशकात वेस्ट इंडिजच्या संघात लेस्ली हिल्टन यांच्या नावाचा दबदबा होता. एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी वेस्ट इंडिजसाठी 40 कसोटी सामने खेळले. त्यांच्या घातक गोलंदाजीसमोर भलेभले फलंदाज ढेपाळायचे. मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यात 1942 मध्ये एक मुलगी आली. दोघांनी लग्न केलं आणि सुखाचा संसार सुरू झाला. मात्र, हे सुख फार काळ टिकू शकलं नाही. काही वर्षांतच त्यांच्या नात्यात संशयाचं भूत शिरलं. हिल्टन यांना काही अशी पत्रं आणि संदेश मिळाले, ज्यामुळे त्यांच्या पत्नीचे इतर दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय बळावला आणि इथूनच एका रक्तरंजित खेळाची सुरुवात झाली.
दरम्यान, मे 1954 मध्ये घरात पती-पत्नीमध्ये भांडण झालं. रागाच्या भरात हिल्टन यांच्यातील खेळाडू संपला आणि एक क्रूर मारेकरी जागा झाला. त्यांनी घरातून बंदूक काढली आणि स्वतःच्या पत्नीवर एकापाठोपाठ एक अशा अनेक गोळ्या झाडल्या. त्याची पत्नी लुरलाइन रोज रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या थरारक हत्येच्या बातमीने केवळ कॅरेबियन देशच नव्हे, तर संपूर्ण जागतिक क्रिकेटविश्व हादरून गेलं.
अन् कोर्टाच्या एका निकालाने इतिहास बदलला!
हे हाय-प्रोफाइल प्रकरण न्यायालयात पोहोचलं. वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, हिलटन हे पत्नीच्या वागण्यामुळे मानसिकदृष्ट्या खचले होते आणि त्यांनी हे पाऊल रागाच्या भरात उचललं. परंतु, सरकारी पक्षाने हिलटन यांचा हत्येचा स्पष्ट हेतू कोर्टासमोर सिद्ध केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हिलटन यांना दोषी ठरवून थेट फाशीची शिक्षा सुनावली. अनेक दिग्गजांनी त्यांची शिक्षा कमी करण्याची मागणी केली, पण कायद्याने कोणाचीही गय केली नाही.
शेवटी 17 मे 1955 रोजी जमैकामध्ये लेस्ली हिल्टन यांना फाशी देण्यात आली. या ऐतिहासिक निकालासह, हिल्टन हे क्रिकेटच्या इतिहासातील पहिले आणि एकमेव कसोटी क्रिकेटपटू ठरले ज्यांना हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा झाली.
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला