कुर्ती, निळ्या रंगाचा ड्रेस… रस्त्याच्या कडेलाच महिलेचा मृतदेह आढळला; रायगडमध्ये खळबळ – Marathi News | The decomposed body of a woman was found at Palsadari on the Karjat Khopoli highway in Raigad.


रायगड जिल्ह्यात पळसदरी ते तळवळी दरम्यान रस्त्याच्या शेजारील खड्ड्यात एका पस्तीशीच्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या भागात असह्य दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी तपासणी केली असताना एका खड्ड्यात हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी ते तळवली गावादरम्यान रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून दुर्गंधी येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. ही दुर्गंधी वाढल्यानंतर नागरिकांनी पाहणी केली असता खड्ड्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्यांनी पंचनामा करुन अधिक तपास सुरु केला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद रोकडे, हवालदार लालास तोरवे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यू नेमका कधी झाला हे स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू सुमारे पाच दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत महिलेच्या अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली होती, तर तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी कपडे, दागिने आणि इतर बाबींची नोंद घेतली असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी सुरू केली आहे.

शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा

महिलेचा मृत्यू नैसर्गिक, अपघाती की घातपातातून झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह या ठिकाणी टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून सध्या कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.

महामार्गालगत पुन्हा एकदा अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने पळसदरी, तळवली आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमागील सत्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *