मुंबई : महाराष्ट्र राज्यातील चित्रपट, मालिका व वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत तसेच त्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने (Nationalist Congress Party’s Film, Literature, Art, and Cultural Wing) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील विविध चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत चर्चा करण्यात आली आहे. अन्नाबाबत होत असलेल्या तक्रारी, अन्नसुरक्षा नियमांचे पालन, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न साठवणूक व वितरणाची पद्धत, तसेच संबंधित उत्पादन संस्था व केटरिंग सेवा पुरवठादारांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळाने चित्रीकरण स्थळांवर विशेष तपासणी मोहीम राबववण्याची मागणी केली आहे
शिष्टमंडळाने चित्रीकरण स्थळांवर विशेष तपासणी मोहीम राबविणे, अन्नाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करणे, निकृष्ट व अस्वच्छ अन्न पुरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे तसेच कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नियमित निरीक्षण व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली. यावेळी अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांनी शिष्टमंडळाने मांडलेले सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील आठवड्यात आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आवश्यक ती पावले उचलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील विविध चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्ता चांगली असावी असी मागणी केली आहे.
स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे
या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा निर्माते नितीन धावणे, प्रदेश सरचिटणीस तथा अभिनेत्री अपेक्षा चव्हाण, अभिनेते मिलिंद दास्ताने , अभिनेते सुनील पगार, दिग्दर्शक शरीश राणे,तसेच निर्माते चंद्रकांत विसपुते, मराठी चित्रपट वितरक अजय फुटाणे उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न मिळावे, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे आणि चित्रीकरण स्थळांवर अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली.